कोल्ड ड्रिंकसोबत घरात चक्क झुरळ; श्वेताने तुकाराम मुंढेंना केलं टॅग

    दिनांक :20-Aug-2026
Total Views |
मुंबई
shweta tiwari आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांची अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तपदी नियुक्ती झाल्यानंतर राज्यात धडक कारवायांचं सत्र सुरू आहे. नागरिकही आपल्या समस्या प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्यासाठी त्यांना सोशल मीडियावर सक्रियपणे टॅग करत आहेत. अशातच टीव्ही इंडस्ट्रीतील आघाडीची अभिनेत्री श्वेता तिवारीने सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडीओ शेअर केला आहे. इन्स्टा मार्टवरून कोल्ड ड्रिंकची ऑर्डर केल्यानंतर त्यासोबत चक्क झुरळ घरात पोहोचल्याचा दावा तिने केला आहे. या प्रकारानंतर श्वेताने इन्स्टा स्टोरीवर व्हिडीओ शेअर करत थेट एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांना टॅग करून या प्रकरणाकडे लक्ष देण्याची विनंती केली आहे.
 

shweta tiwari claims cockroach delivered with cold drink order, tags fda commissioner tukaram mundhe 
श्वेता तिवारीने इन्स्टा मार्टवरून रेड बुलसह काही कोल्ड ड्रिंक्स मागवले होते. मात्र, ऑर्डरसोबत झुरळही घरात आल्याचं तिने व्हिडीओच्या माध्यमातून सांगितलं. शेअर केलेल्या क्लिपमध्ये घरात फिरणारं झुरळ स्पष्टपणे दिसत असून, ऑर्डर केलेल्या वस्तू दाखवत असताना श्वेताने या प्रकाराबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली.
या व्हिडीओमध्ये श्वेता म्हणते, “मी इन्स्टा मार्टवरून रेड बुल मागवलं होतं. या ऑर्डरसह आमच्या घरात कॉक्रोचसुद्धा आलं. हा कॉक्रोच संपूर्ण घरात इथे-तिथे पळतोय. आम्ही तुकाराम मुंढे यांना टॅग करावं का? इन्स्टा मार्टवरून आमच्या घरात कॉक्रोच येत आहेत. तुम्ही कुठे आहात? कृपया याकडे लक्ष द्या.” अशा शब्दांत तिने आपली नाराजी व्यक्त केली.
तुकाराम मुंढे हे महाराष्ट्रातील अन्नसुरक्षा आणि स्वच्छतेशी संबंधित कारवायांमुळे सध्या चर्चेत आहेत. एफडीए आयुक्त म्हणून त्यांच्या नेतृत्वाखाली विविध खाद्य व्यवसाय, रेस्टॉरंट्स आणि क्विक कॉमर्सशी संबंधित ठिकाणी तपासण्या केल्या जात आहेत. अन्नाचा दर्जा तसेच स्वच्छतेच्या नियमांचं पालन होत आहे की नाही, याकडेही प्रशासनाकडून लक्ष दिलं जात आहे. त्यामुळेच श्वेता तिवारीने त्यांना टॅग करत या प्रकाराची दखल घेण्याची मागणी केली आहे. तिच्या या पोस्टमुळे ऑनलाइन फूड आणि डिलिव्हरी सेवांमध्ये स्वच्छतेचे नियम कितपत पाळले जातात, हा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.श्वेता तिवारी ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री आहे. ‘कसौटी जिंदगी की’ या मालिकेतील प्रेरणा या भूमिकेमुळे तिला घराघरात ओळख मिळाली. तसेच ती ‘बिग बॉस 4’ची विजेती ठरली असून, अनेक मालिकांसोबतच विविध रिअॅलिटी शोमध्येही तिने सहभाग घेतला आहे.