उत्तराखंड
Stray Dog Terror उत्तराखंडातील चमोली जिल्ह्यातील नारायणबगड परिसरात भटक्या कुत्र्यांच्या दहशतीमुळे प्रशासनासमोर मोठे संकट निर्माण झाले आहे. कुत्र्यांच्या हल्ल्यांत आतापर्यंत 11 जण जखमी झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. परिस्थिती इतकी गंभीर झाली आहे की परिसरातील 10 शाळा बंद ठेवण्याची वेळ प्रशासनावर आली असून 600 हून अधिक विद्यार्थ्यांचे वर्ग आता ऑनलाइन घेतले जात आहेत. नागरिक घराबाहेर पडतानाही सुरक्षेसाठी हातात काठी घेऊन बाहेर पडत आहेत.
नारायणबगड परिसरातील भटक्या कुत्र्यांनी नागरिकांना लक्ष्य केल्याने अनेक पालकांनी आपल्या मुलांना शाळेत पाठवणे बंद केले होते. चमोलीचे जिल्हाधिकारी गौरव कुमार यांच्या आदेशानंतर मुख्य शिक्षण अधिकारी आकाश सारस्वत यांनी शाळा बंद ठेवण्यासंदर्भात आदेश जारी केला. सुरुवातीला 10 ते 13 ऑगस्ट असे चार दिवस शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर ही सुट्टी दोन दिवसांपर्यंत मर्यादित करण्यात आली.
दरम्यान, हिंसक आणि पिसाळलेल्या कुत्र्यांना पकडण्यासाठी वन विभागाने क्विक रिस्पॉन्स टीमची मोहीम सुरू केली आहे. आतापर्यंत या पथकाने तीन कुत्र्यांना पकडले आहे. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, एका पिसाळलेल्या कुत्र्याने इतर कुत्र्यांना चावा घेतल्यामुळे परिसरातील अनेक कुत्रे पिसाळले असावेत आणि त्यानंतर ते अधिक आक्रमक झाल्याचे सांगितले जात आहे. मात्र, या दाव्याला अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.
स्थानिकांच्या माहितीनुसार, रविवार आणि सोमवारी तीन जणांवर कुत्र्यांनी हल्ला केला. मंगळवारी शाळकरी मुलांसह चार जणांना कुत्र्यांनी चावा घेतला. त्यानंतर बुधवारी तीन शाळकरी मुलांसह आणखी चार जणांवर हल्ला करण्यात आला. जखमी झालेल्या दीपांशु बिष्ट, मानवी, वैष्णवी, मजूर प्रकाश आणि पंती गावातील रहिवासी लक्ष्मी यांच्यासह अन्य जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांना प्रतिबंधात्मक उपचार म्हणून अँटी-रेबीजची इंजेक्शन्स देण्यात आली आहेत.
कुत्र्यांच्या उपद्रवामुळे शाळा Stray Dog Terror बंद करण्याची ही देशातील दुसरी घटना असल्याचे सांगितले जात आहे. यापूर्वी जम्मू-काश्मीरमधील राजौरी येथेही कुत्र्यांच्या दहशतीमुळे आठ पंचायत क्षेत्रांतील शाळा एका दिवसासाठी बंद ठेवण्यात आल्या होत्या. त्यावेळी नागरिकांच्या सुरक्षेसाठी सीआरपीएफचे पथकही तैनात करण्यात आले होते.दरम्यान, रस्त्यावरील कुत्रे विविध कारणांमुळे आक्रमक होऊ शकतात. वाहनांमुळे जखमी होणे, प्रजननाचा काळ किंवा परिसरातील अन्न आणि अधिवासासाठी होणारी स्पर्धा यांसारख्या कारणांमुळे त्यांच्या वर्तनात आक्रमकता दिसून येऊ शकते. मात्र, नारायणबगड परिसरातील कुत्रे नेमके कोणत्या कारणामुळे हिंसक झाले आहेत, याबाबत अधिकृत तपास आणि निष्कर्ष अद्याप समोर आलेला नाही.