नवी दिल्ली,
Sugar price hits the ₹65 mark श्रावण महिन्यासोबतच देशभरात सणासुदीची लगबग सुरू झाली असताना साखरेच्या वाढत्या दराने सर्वसामान्यांच्या बजेटवर मोठा परिणाम केला आहे. गेल्या काही दिवसांत साखरेच्या किमतीत झपाट्याने वाढ झाली असून, तीन दिवसांत दर ५० रुपयांवरून ६० आणि आता थेट ६५ रुपये प्रति किलोपर्यंत पोहोचल्याचे चित्र आहे. गेल्या २० दिवसांचा विचार केला तर साखरेच्या दरात जवळपास २० रुपयांची वाढ झाल्याचे सांगितले जात आहे.रक्षाबंधन, गणेश चतुर्थी, कृष्ण जन्माष्टमी, करवा चौथ आणि दिवाळी असे सण पुढील काळात येणार आहेत. या काळात घरगुती गोड पदार्थांपासून मिठाईपर्यंत साखरेचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो. मात्र, सण सुरू होण्यापूर्वीच साखरेच्या दराने उचल खाल्ल्याने मध्यमवर्गीय कुटुंबांसमोर खर्चाचे नवे आव्हान उभे राहिले आहे.
साखरेच्या किमती वाढल्याचा थेट परिणाम केवळ घरगुती वापरावर होणार नसून, साखरेपासून तयार होणाऱ्या अनेक खाद्यपदार्थांच्या किमतीही वाढण्याची शक्यता आहे. चहातील साखरेपासून सणासुदीच्या मिठाईपर्यंत सर्वच वस्तूंवर या दरवाढीचा परिणाम होऊ शकतो. मात्र, साखरेच्या किमती अचानक का वाढत आहेत, याचे स्पष्ट कारण ग्राहक आणि काही व्यापाऱ्यांनाही समजत नसल्याचे चित्र आहे.मध्य प्रदेशात पोहे-जिलेबी हा लोकप्रिय नाश्ता मानला जातो. साखरेच्या दरवाढीचा फटका जिलेबीसह इतर गोड पदार्थांनाही बसण्याची शक्यता आहे. माळवा प्रदेशातील प्रसिद्ध मावा बाटी आणि गुलाबजामुन यांच्या किमतींवरही वाढत्या साखरदराचा परिणाम होऊ शकतो.साखरेचा दर वाढल्याने मिठाई तयार करण्याचा खर्च वाढणार असल्याने विक्रेत्यांसमोरही मोठी अडचण निर्माण झाली आहे. खर्च वाढला तरी ग्राहकांना वाढीव दराने मिठाई विकणे कितपत शक्य होईल, हा प्रश्न दुकानदारांसमोर आहे.