चेन्नई
tamil nadu cm vijay तामिळनाडूचे मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय यांनी बुधवारी विधानसभेत मोठा दावा करत तीन सरकारी विभागांमधील कथित भ्रष्टाचाराशी संबंधित फाइल्स आपल्याकडे असल्याचे सांगितले. या फाइल्समध्ये कथित भ्रष्टाचाराचे सविस्तर पुरावे असल्याचा दावा करत त्यांनी DMKच्या माजी मंत्र्यांना आणि आमदारांना इशारा दिला की, या फाइल्स ‘उघडण्यासाठी’ आपल्याला भाग पाडू नये. योग्य वेळी ही माहिती सार्वजनिक करू, असेही विजय यांनी स्पष्ट केले.
जलसंपदा विभागाचे मंत्री एन. आनंद यांच्या वक्तव्यावरून विधानसभेत सत्ताधारी आणि DMK आमदारांमध्ये तीव्र खडाजंगी झाली. मागील सरकारच्या गृहनिर्माण योजनेत मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचा आरोप आनंद यांनी केला. तसेच अपात्र व्यक्तींनाही घरे मंजूर करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. DMKचे माजी मंत्री आय. पेरियासामी हे पक्षाच्या ‘कलैग्नार कनावु इल्लम थिट्टम’ या विशेष योजनेवर भाषण करत असताना आनंद यांनी हे आरोप केले.
या चर्चेत सहभागी होताना शालेय शिक्षणमंत्री ए. राजमोहन यांनी भ्रष्टाचाराचे पुरावे समोर आल्यानंतर DMKचे आमदार शांत बसतात, असा आरोप केला. मुख्यमंत्री भ्रष्टाचाराशी संबंधित संपूर्ण अहवाल जाहीर करतील, तेव्हा DMK नेत्यांची प्रतिक्रिया काय असेल, याची आपण कल्पनाही करू शकत नसल्याचे राजमोहन म्हणाले. त्यांच्या या वक्तव्याला विरोधी सदस्यांनी जोरदार आक्षेप घेतला आणि करण्यात आलेले आरोप सिद्ध करण्यासाठी तातडीने पुरावे सादर करण्याची मागणी केली.या वेळी चर्चेत हस्तक्षेप करत मुख्यमंत्री विजय यांनी थेट विरोधकांना उद्देशून भाष्य केले. ते म्हणाले, “तुम्ही पुरावे मागत आहात. आठवडाभरापूर्वी अर्थमंत्री एन. मेरी विल्सन यांनी विधानसभेत सांगितले होते की, तीन विभागांच्या सविस्तर आढावा अहवालांचा संच मला सादर करण्यात आला आहे. सविस्तर पुरावे असलेले ते अहवाल माझ्या टेबलवर आहेत. मला ते उघडण्यासाठी भाग पाडू नका. योग्य वेळी मी त्यांचा खुलासा करेन.”आपल्याला “कधी आणि कसे बोलायचे” हे चांगले माहीत असल्याचे सांगत विजय यांनी विरोधकांना सावध केले. “आम्ही प्रेम आणि आपुलकीने बोललो, म्हणूनच लोकांनी आम्हाला मतदान करून विधानसभेत पाठवले,” असेही त्यांनी म्हटले. आगामी पोटनिवडणुकांमध्ये कोणाला मदत व्हावी, यासाठी आपण आतापर्यंत शांत राहिलो, असेही विजय यांनी स्पष्ट केले.