हैदराबाद
School Principal Murder Case खासगी शाळेच्या मुख्याध्यापिका रुपा रेड्डी यांची राहत्या घरी चाकूने सपासप वार करून हत्या केल्याची धक्कादायक घटना हैदराबादमधील नलगोंडा जिल्ह्यात घडली आहे. या हत्येप्रकरणी त्यांच्याच शाळेतील दहावीच्या दोन अल्पवयीन विद्यार्थ्यांना पोलिसांनी अटक केली आहे. घरात चोरी करताना पकडल्यामुळे विद्यार्थ्यांनी रुपा रेड्डी यांची हत्या केल्याचा आरोप असून, या घटनेमुळे शिक्षणक्षेत्रात खळबळ उडाली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, रुपा रेड्डी 11 ऑगस्ट रोजी त्यांच्या घरी एकट्या असताना मृतावस्थेत आढळल्या. त्यांच्या शरीरावर चाकूने तब्बल 27 वार करण्यात आले होते. घटनेच्या दिवशी त्या आपल्या मावशीसोबत फोनवर बोलत होत्या. फोन बंद होण्यापूर्वीच्या शेवटच्या संभाषणात त्यांनी ‘बाबू’ हा शब्द उच्चारल्याचे तपासात समोर आले आहे. विद्यार्थ्यांना संबोधताना ‘बाबू’ हा शब्द सर्रास वापरला जात असल्याने पोलिसांनी या दिशेनेही तपास सुरू केला.
दरम्यान, हत्येनंतर दोन अल्पवयीन विद्यार्थी अचानक मोठ्या प्रमाणात पैसे खर्च करू लागल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. ते मित्रांसोबत पार्ट्या करत असल्याची माहितीही समोर आली. त्यामुळे पोलिसांचा संशय या दोघांवर बळावला. नलगोंडा पोलिसांनी दोन्ही विद्यार्थ्यांना ताब्यात घेतल्यानंतर चौकशी केली असता हत्याकांडाचा धक्कादायक तपशील समोर आल्याचे सांगण्यात आले.
पोलिसांनी आरोपींकडून 1.51 लाख रुपयांची रोकड आणि एक आयफोन जप्त केला आहे. हत्येनंतर मिळालेले पैसे त्यांनी आपल्या पालकांना दिल्याचा दावा विद्यार्थ्यांनी केल्याचे पोलिसांनी सांगितले. मात्र, या पैशांवर मानवी रक्ताचे अंश आढळून आल्याची माहितीही पोलिसांनी दिली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, दोन्ही अल्पवयीन मुलांना दारूचे व्यसन होते. त्यापैकी एकाला बाईक आणि कार चालवण्याची विशेष आवड होती आणि त्याला झटपट पैसे कमवायचे होते. मुख्याध्यापिकेची हत्या करण्यापूर्वी दोघांनी त्यांच्या घरावर लक्ष ठेवले होते. हत्येच्या सुमारे पाच दिवस आधीच त्यांनी हा कट रचल्याचा आरोप आहे.पोलिसांच्या तावडीत सापडू नये म्हणून आरोपी विद्यार्थ्यांनी हातमोजे वापरण्याची तयारी केली होती. तसेच सीसीटीव्ही कॅमेरे असलेल्या ठिकाणांची पाहणीही केली होती. 11 ऑगस्ट रोजी त्यापैकी एका विद्यार्थ्याने घराच्या कंपाउंडची भिंत ओलांडून घरात प्रवेश केला, तर दुसरा घराबाहेर थांबला होता.घरात प्रवेश केल्यानंतर विद्यार्थ्याने चोरी करण्यास सुरुवात केली. मात्र, चोरी करत असताना रुपा रेड्डी यांनी त्याला पाहिल्याचा आरोप आहे. त्यानंतर विद्यार्थ्याने त्यांच्यावर चाकूने तब्बल 27 वार केले. या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर घरातील सुमारे अडीच लाख रुपये घेऊन आरोपी फरार झाल्याचे पोलिसांनी सांगितले. हत्येनंतर पुरावे नष्ट करण्याचाही प्रयत्न केल्याचा आरोप आहे.या प्रकरणात शाळेतील कर्मचारी आणि रुपा रेड्डी यांच्या परिचयातील विद्यार्थ्यांचीही पोलिसांनी चौकशी केली आहे. तपासादरम्यान विद्यार्थ्यांच्या संशयास्पद वर्तनामुळे पोलिसांना महत्त्वाचा धागा मिळाला आणि त्यानंतर दोन्ही अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेण्यात आले. या धक्कादायक हत्याकांडाचा पुढील तपास नलगोंडा पोलीस करत आहेत.