अनिल कांबळे
नागपूर,
central jail मध्यवर्ती कारागृहाबाहेर बुधवारी दोन गट आमनेसामने आल्याची चर्चा रंगल्याने पोलिस दलात दिवसभर खळबळ उडाली. कारागृहातून विशाल नावाचा आरोपी सुटल्यानंतर त्याला घेण्यासाठी काही समर्थक कारागृहाबाहेर आले होते. याचवेळी दुसऱ्या गटातील काही जणही तेथे पोहोचल्याची माहिती आहे. दोन्ही गट एकाच ठिकाणी आल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाल्याची चर्चा होती. मात्र, घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांना मारामारी किंवा प्रत्यक्ष वाद झाल्याचे दिसून आले नाही.
जुन्या वादातून पुन्हा हालचाली वाढल्याची चर्चा
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काही महिन्यांपूर्वी कारागृहात विशाल आणि योगेश यांच्यात कोणत्या तरी कारणावरून वाद झाला होता. सुमारे महिनाभरापूर्वी योगेश कारागृहातून बाहेर आला आहे. बुधवारी विशालची सुटका होणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्याला घेण्यासाठी आशू, कुणाल यांच्यासह काही समर्थक कारागृहाबाहेर पोहोचल्याची चर्चा आहे.
याचदरम्यान दुसऱ्या गटातील काही जणही कारागृह परिसरात आल्याचे सांगितले जात आहे. दोन्ही गट एकाच ठिकाणी दिसल्याने परिसरात उपस्थित नागरिकांमध्ये विविध चर्चांना उधाण आले. यावेळी दोन्ही गटांकडून शस्त्रे काढण्यात आल्याचीही चर्चा होती. मात्र, पोलिसांनी या प्रकाराला अधिकृत दुजोरा दिलेला नाही.
माहिती मिळताच धंतोली पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले. धंतोलीचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक साईनाथ रामोड यांनी सांगितले की, पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर पथक तातडीने कारागृहाबाहेर गेले. मात्र, घटनास्थळी कोणताही वाद किंवा मारामारी झाल्याचे आढळून आले नाही.
दरम्यान, गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक २च्या पोलिस निरीक्षक शुभांगी देशमुख यांनाही या प्रकाराची माहिती मिळाली होती. त्यानंतर त्यांनी एक पथक घटनास्थळी पाठविले.central jail मात्र, पथकाला तेथे कोणतीही संशयास्पद घटना आढळून आली नसल्याचे सांगण्यात आले.
तरीही या प्रकाराची संपूर्ण वस्तुस्थिती स्पष्ट करण्यासाठी पोलिसांकडून आता कारागृहाच्या प्रवेशद्वारासह परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासण्यात येणार आहे. फुटेजच्या आधारे दोन्ही गट प्रत्यक्षात तेथे उपस्थित होते का, त्यांच्यात काही वाद झाला होता का आणि शस्त्रांचा वापर झाल्याची चर्चा कितपत खरी आहे, याचा उलगडा होणार आहे.
सध्या पोलिसांनी कारागृह परिसरातील सुरक्षा आणि हालचालींवर लक्ष वाढविले असून, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संपूर्ण घटनाक्रमाची माहिती गोळा केली जात आहे.