विशाखापट्टणम
Visakhapatnam School Shock ज्या वयात सहा वर्षांच्या चिमुरड्याच्या हातात पुस्तके आणि शाळेत जाण्याचा उत्साह असायला हवा, त्याच वयात घडलेल्या एका धक्कादायक घटनेने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. एलकेजीमध्ये शिकणारा अवघा सहा वर्षांचा मुलगा होमवर्क पूर्ण न केल्याने शिक्षकांचा आवाज वर चढला आणि एक झापड मारली मग अचानक मुलगा बेशुद्ध होऊन त्यांच्यावरच कोसळला. त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले; मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. प्राथमिक माहितीनुसार, मुलाचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचे सांगितले जात आहे. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यानंतर अनेक प्रश्न उपस्थित झाले असून, मुलाच्या मृत्यूस जबाबदार असलेल्या व्यक्तींवर कारवाई करण्याची मागणी त्याच्या पालकांनी केली आहे.
ही घटना शहरातील लिटिल गार्डन स्कूलमध्ये घडल्याचे सांगण्यात येत आहे. समोर आलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये मुलगा इतर विद्यार्थ्यांसोबत वर्गात रांगेत उभा असल्याचे दिसते. फुटेजनुसार, त्यावेळी तो घाबरलेला दिसत होता. त्यानंतर शिक्षक मुलाचा गणवेश व्यवस्थित करताना दिसतात. याचदरम्यान मुलगा रडू लागतो आणि शिक्षकांनी त्याला कथितपणे एक झापड मारल्याचे फुटेजमध्ये दिसत असल्याचे सांगण्यात येत आहे. थप्पझापड लगावल्यानंतर लगेचच मुलगा शिक्षकांच्या अंगावर कोसळतो.
घटना घडल्यानंतर शाळेत एकच गोंधळ उडाला. मुलाला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले; मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. मुलाचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचे प्राथमिक माहितीतून समोर आले असले, तरी मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.घटनेची माहिती मिळताच मुलाचे आई-वडील आणि नातेवाईक शाळेत पोहोचले. सीसीटीव्ही फुटेज पाहिल्यानंतर संतप्त झालेल्या नातेवाईकांनी शाळा प्रशासनाविरोधात नाराजी व्यक्त करत शाळेबाहेर आंदोलन केले. मुलासोबत झालेल्या मारहाणीमुळे त्याची प्रकृती बिघडली आणि त्यानंतर त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.दरम्यान, सुरुवातीच्या माहितीत मुलाच्या मृत्यूचा संबंध संशयित हृदयविकाराच्या झटक्याशी जोडला जात आहे. मात्र या मृत्यूमागील नेमके कारण पोस्टमार्टम अहवाल आणि वैद्यकीय तपासणीनंतरच स्पष्ट होणार आहे. त्यामुळे सीसीटीव्ही फुटेज, वैद्यकीय अहवाल आणि इतर उपलब्ध पुराव्यांच्या आधारे या प्रकरणाचा तपास महत्त्वाचा ठरणार आहे.
a