मुंबईत तृतीयपंथीयाचा वेश धारण करून एअर होस्टेसवर अत्याचार

आरोपी कळव्यातून ताब्यात

    दिनांक :21-Aug-2026
Total Views |
मुंबई,
air hostess assaulted in mumbai मुंबईतील हायप्रोफाईल पवई परिसरात एक अत्यंत भयानक आणि खळबळजनक घटना समोर आली आहे. अनिल शिंदे नावाच्या ३० वर्षीय पुरुषाने साडी नेसून आणि तृतीयपंथी असल्याचे भासवून एका इमारतीत प्रवेश केला. सिक्युरिटी गार्डला चकवा देत त्याने अनेक घरांचे दरवाजे ठोठावले. अखेर एका तिसऱ्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये राहणाऱ्या महिलेने दरवाजा उघडला. पीडित महिलेचा पती रुग्णालयात उपचार घेत असल्याने आरोपीने तिचा गैरफायदा घेतला. पतील बरे करण्याचे, त्याची दृष्ट काढण्याचे आणि आशीर्वाद देण्याचे आमिष दाखवून त्याने घरात प्रवेश मिळवला.
 
air hostess assaulted in mumbai
 
घरात शिरल्यानंतर आरोपीने महिलेच्या डोक्यावर हात ठेवून पाणी शिंपडले आणि अघोरी विधीचा बहाणा केला. त्यानंतर त्याने थेट शारीरिक इजा करण्याची धमकी देत एअर होस्टेस असलेल्या या पीडित महिलेवर जबरदस्तीने बलात्कार केला. पीडितेने आरडाओरडा करण्याचा प्रयत्न केला असता, आरोपीने तिच्याकडून २,००० रुपये हिसकावून घेतले आणि घटनास्थळावरून पळ काढला. ही संपूर्ण घटना १९ ऑगस्ट रोजी घडली असून, या धक्कादायक प्रकारानंतर पीडित महिलेने रात्री ११ वाजण्याच्या सुमारास पवई पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली.
 
तपास सुरू करताच पोलिसांनी इमारतीतील आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची सखोल तपासणी केली. फुटेजमध्ये साडी नेसलेला आरोपी ऑटो रिक्षातून ठाण्यातील खारेगाव झोपडपट्टीच्या दिशेने पळून जाताना स्पष्ट दिसला. पोलिसांनी तात्काळ ऑटो रिक्षाच्या नोंदणी क्रमांकावरून चालकाचा शोध घेतला आणि आरोपी कुठे उतरला याची माहिती मिळवली. मिळालेल्या सुगाव्याच्या आधारे पोलिसांनी कळवा परिसरात सापळा रचून आरोपी अनिल शिंदेला बेड्या ठोकल्या.
 
पोलीस तपासात आरोपीबद्दल धक्कादायक माहिती समोर आली आहे. अनिल शिंदे आणि त्याचे कुटुंब हे तृतीयपंथी अन् भिकारी असल्याचा बनाव करून भीक मागण्याचे काम करतात. आरोपीने यापूर्वीही असाच वेश बदलून गुन्हे केल्याचे उघडकीस आले आहे. सध्या आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून त्याच्यावर बलात्कार आणि गुन्हेगारी धमकीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणात काळ्या जादूशी संबंधित कलमेही वाढवली जाण्याची शक्यता असून पवई पोलीस पुढील तपास करत आहेत. दरम्यान, छत्रपती संभाजीनगरमध्येही एका गुन्ह्याची नोंद झाली आहे, जिथे ग्राहक असल्याचा आव आणून बुरखा घातलेल्या चार महिलांनी दोन पुरुषांच्या मदतीने तब्बल दीड किलो सोन्याची चोरी केली आहे.