अनिल कांबळे

नागपूर,

distributors account मुंबईस्थित फिनटेक कंपनीच्या एका कर्मचाऱ्याने वितरकाच्या लॉगिन आयडी आणि पासवर्डचा गैरवापर करून त्याच्या खात्यातील तब्बल १० लाख ६८ हजार ९१६ रुपयांची रक्कम स्वतःच्या खात्यात वळविल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी नंदनवन पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आरोपी सुधीर हरिराम कुशवाह (३२) असे आरोपीचे नाव आहे.
 
 
distributors account

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शंकर सुधाकर वढ (४०), रा. नंदनवन, यांनी दिलेल्या तक्रारीवरून १९ ऑगस्ट रोजी नंदनवन पोलिस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी सुधीर हरिराम कुशवाह (३२) हा मुंबईस्थित रॅपिपे फायनटेक प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत कर्मचारी आहे. ही कंपनी डिजिटल पेमेंट, पैसे हस्तांतरण तसेच ऑनलाइन व्यावसायिक सेवा पुरवते. वढ यांनी कुशवाहच्या माध्यमातून कंपनीची वितरक एजन्सी घेतली होती. दरम्यान, वढ आणि त्यांच्या पत्नीला कंपनीच्या ऑनलाइन पोर्टलवर लॉगिन करताना अडचणी येत होत्या.

 
 
ही समस्या दूर करण्यासाठी त्यांनी कुशवाह याला वितरकाचा लॉगिन आयडी आणि पासवर्ड दिला होता. पोलिसांच्या माहितीनुसार, मिळालेल्या या लॉगिन तपशिलांचा कुशवाहने कथित गैरवापर केला. त्याने कंपनीच्या प्रणालीमध्ये अनधिकृत नोंदी करून वितरकाच्या खात्यातील १० लाख ६८ हजार ९१६ रुपये स्वतःच्या खात्यात वळविल्याचा आरोप आहे. त्यानंतर ही रक्कम वैयक्तिक खर्चासाठी वापरल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी नंदनवन पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमांनुसार विश्वासघात, फसवणूक, बनावट कागदपत्रे तयार करणे आणि गुन्हेगारी कटाच्या आरोपांसह माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६६(ब) आणि ६६(क) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आरोपीला अद्याप अटक करण्यात आलेली नाही. पोलिसांकडून संबंधित आर्थिक व्यवहारांची तपासणी सुरू असून, या कथित फसवणुकीची व्याप्ती किती आहे, याचाही तपास केला जात आहे.