नागपूर,
crime solved within 24 hours कोराडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या चोरीचा गुन्हा गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक ६च्या पथकाने अवघ्या २४ तासांत उघडकीस आणला. पोलिसांनी या प्रकरणात २३ वर्षीय आरोपीला ताब्यात घेत त्याच्याकडून सुमारे २३ तोळे सोने आणि मोबाईल असा एकूण २७ लाख ७८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. शांतनू चंदू वानखडे (२३, रा. माधान, ता. चांदूरबाजार, जि. अमरावती) असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी कोराडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोराडीतील केटीपीएस कॉलनीतील राहणारे संदीप वामनराव वानखेडे (४९) यांच्या घरात १६ ऑगस्ट रोजी रात्री २ वाजेपासून १८ ऑगस्ट रोजी सकाळी १०.३० वाजेदरम्यान चोरी झाली होती. याप्रकरणी तक्रार दाखल झाल्यानंतर गुन्हे शाखा युनिट क्रमांक ६च्या पथकाने समांतर तपास सुरू केला. तपासादरम्यान वरिष्ठ पोलिस निरीक्षक भरत कऱ्हाडे यांना मिळालेल्या खात्रीशीर गुप्त माहितीच्या आधारे तसेच तांत्रिक मदतीने आरोपीचा शोध घेण्यात आला. अवघ्या २४ तासांत पोलिसांनी शांतनू वानखडे याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याचा गुन्ह्यात सहभाग निष्पन्न झाल्यानंतर त्याच्याकडून चोरीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
चोरीचा मुद्देमाल जप्त
पोलिसांनी आरोपीकडून ८० ग्रॅम वजनाचा पिवळ्या धातूचा सिक्का, ५० ग्रॅमचा सिक्का, ३५ ग्रॅमचे मंगळसूत्र, १४ ग्रॅमची चैन, १६ ग्रॅमच्या दोन बांगड्या, ४ ग्रॅमच्या दोन कानातील रिंग, तसेच १० ग्रॅमचे दोन सिक्के, ५ ग्रॅमचा सिक्का आणि ५ ग्रॅमची अंगठी असा सोन्याचा ऐवज जप्त केला. यासोबतच विवो व्ही-७ कंपनीचा मोबाईलही जप्त करण्यात आला आहे. जप्त केलेल्या सोन्याचे एकूण वजन सुमारे २३ तोळे असून, सोन्यासह मोबाईलची एकूण किंमत २७ लाख ७८ हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. आरोपीची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर त्याला पुढील कारवाईसाठी कोराडी पोलिस ठाण्याच्या रात्रपाळी अधिकाऱ्यांच्या ताब्यात देण्यात आले. या कारवाईमुळे घरफोडीचा गुन्हा अल्पावधीत उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले.