वयाला हरवून ज्येष्ठांची फॅशनेबल ‘सेकंड इनिंग’

    दिनांक :21-Aug-2026
Total Views |

नागपूर,

seniors fashionable second innings ओसरी प्रॉडक्शन्सच्या वतीने जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनाच्या पूर्वसंध्येला ६५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘ज्येष्ठ नागरिक फॅशन शो : सेकंड इनिंग’चे आयोजन करण्यात आले. शंकरनगर चौकातील साई सभागृहात झालेल्या या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमात ज्येष्ठांनी रॅम्प वॉक, नृत्य आणि अभिनयाच्या माध्यमातून आपल्या कलागुणांचे उत्स्फूर्त सादरीकरण केले.
 
 
seniors fashionable second innings
 
ज्येष्ठांच्या आयुष्यात उत्साहाचे नवे रंग भरावेत आणि त्यांना आपल्या कलागुणांना वाव देण्यासाठी व्यासपीठ मिळावे, हा या उपक्रमामागील उद्देश होता. या फॅशन शोचे हे तिसरे पर्व असून, सुमारे १४ वर्षांपूर्वी ज्येष्ठ नागरिकांसाठी पहिल्यांदा फॅशन शो आयोजित केल्याची माहिती सुप्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांनी दिली. कार्यक्रमाला जयप्रकाश गुप्ता, विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष डॉ. गिरीश गांधी, स्मिता हॉलिडेजचे जयंत गोरे, रोटरी क्लबच्या अध्यक्षा स्वप्ना नायर यांच्यासह कारागृह अधीक्षक वैभव आगे, दीपा आगे, माहा चायचे सीएमडी प्रदीप कुळकर्णी आणि पिंकू जोसेफ उपस्थित होते.
 
 
कार्यक्रमाची सुरुवात गौरी जथे यांच्या नृत्याने झाली. त्यांच्या सादरीकरणाला उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली. डॉ. स्मिता दाभोळकर-सिंग यांच्या स्टँडअप कॉमेडीने कार्यक्रमात हास्याची रंगत आणली. फॅशन शोमध्ये ६५ ते ८५ वर्षे वयोगटातील ज्येष्ठांनी उत्साहाने सहभाग घेतला. त्यांच्या आत्मविश्वासपूर्ण रॅम्प वॉकने सभागृह टाळ्या आणि शिट्ट्यांनी दणाणून गेले. रेट्रो, फंकी आणि पारंपरिक अशा तीन फेऱ्यांमध्ये स्पर्धकांनी विविध वेशभूषांचे सादरीकरण केले. रेट्रो फेरीत ९०च्या दशकातील वेशभूषा, फंकी फेरीत कल्पक आणि हटकी रूपे, तर पारंपरिक फेरीत भारतीय संस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या वेशभूषा सादर करण्यात आल्या. यासोबतच ज्येष्ठांनी नृत्य, अभिनय आदी कलांचेही सादरीकरण केले. मनीषा बावनकर, प्रांजली शेवाळे आणि विजय जथे यांनी कोरिओग्राफर म्हणून काम पाहिले.