इस्लामाबाद,
Imran Khan to Adiala Jail पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना शिफा रुग्णालयात वैद्यकीय तपासणी केल्यानंतर पुन्हा अदियाला तुरुंगात आणण्यात आले आहे. यापूर्वी त्यांना कडेकोट सुरक्षाव्यवस्थेत शिफा रुग्णालयात नेण्यात आले होते. त्यांच्या रुग्णालयातील उपस्थितीच्या पार्श्वभूमीवर परिसरात मोठ्या प्रमाणावर सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली होती. पोलिसांनी रुग्णालयाच्या आसपासचा भाग सील केला होता, तर प्रसारमाध्यमांनाही रुग्णालयापासून दूर ठेवण्यात आले होते. रुग्णालयाच्या परिसरात पाकिस्तानी लष्कर आणि पोलिसांचे जवानही तैनात करण्यात आले होते.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर इम्रान खान यांना शिफा रुग्णालयात नेण्यात आले. पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या प्रकृतीचा विचार करून चांगल्या वैद्यकीय उपचारांसाठी त्यांना शिफा आंतरराष्ट्रीय रुग्णालयात दाखल करण्याचे निर्देश दिले होते. त्यांच्या आरोग्याचे संरक्षण, जगण्याचा अधिकार आणि आवश्यक वैद्यकीय सेवा मिळण्याची घटनात्मक हमी लक्षात घेऊन हा आदेश देण्यात आला. यासोबतच इम्रान खान यांच्या कुटुंबीयांना आठवड्यातून एकदा त्यांची भेट घेता यावी, यासाठी व्यवस्था करण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले.
इम्रान खान यांच्या बाजूने सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आल्यानंतर पाकिस्तानी सरकारने या निर्णयाचा पुनर्विचार करण्यासाठी याचिका दाखल केली. मात्र, अपूर्ण कागदपत्रे आणि पेपरबुक्स उपलब्ध नसल्याचे कारण देत सर्वोच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रार कार्यालयाने ही याचिका फेटाळून लावली. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय शरीफ सरकारसाठी मोठा धक्का मानला जात आहे. मंगळवारी पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने गेल्या तीन वर्षांपासून तुरुंगात असलेल्या माजी पंतप्रधान इम्रान खान यांना ४८ तासांच्या आत खासगी रुग्णालयात दाखल करण्याचे निर्देश दिले होते. सरन्यायाधीशांच्या खंडपीठाने दिलेल्या आदेशात इम्रान खान यांची प्रकृती चांगली नसल्याचे नमूद करण्यात आले होते. त्यामुळे त्यांना चांगल्या उपचारांची आवश्यकता असून, सरकारने इस्लामाबादमधील शिफा रुग्णालयात त्यांना दाखल करावे, असे न्यायालयाने स्पष्ट केले होते. मात्र, त्यानंतर बुधवारी शहबाज शरीफ यांच्या सरकारने सर्वोच्च न्यायालयाकडे या निर्णयाचा फेरविचार करण्याची मागणी केली.