वंदे मातरम’वरून कंगना विरुद्ध शर्मिला टागोर

    दिनांक :21-Aug-2026
Total Views |
मुंबई,
kangana vs sharmila ‘वंदे मातरम’ या राष्ट्रगीताच्या आशयावरून सुरू असलेल्या चर्चेला आता अभिनेत्री आणि खासदार कंगना रणौत यांच्या प्रतिक्रियेमुळे नवे वळण मिळाले आहे. ज्येष्ठ अभिनेत्री शर्मिला टागोर यांनी ‘वंदे मातरम’च्या शेवटच्या कडव्यांमध्ये हिंदू देवतांचा उल्लेख असल्याने त्यातील केवळ पहिली दोन कडवी ठेवण्याची सूचना केली होती. त्यांच्या या भूमिकेवर कंगना रणौत यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली असून, कला आणि कवितेकडे केवळ धार्मिक दृष्टिकोनातून पाहणे योग्य नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.
 
kangana vs sharmila
 
आयएएनएसला दिलेल्या अलीकडील मुलाखतीत शर्मिला टागोर यांनी ‘वंदे मातरम’च्या विविध धर्मीय लोकांसाठी असलेल्या प्रासंगिकतेवर भाष्य केले. त्या म्हणाल्या की, अनेक धार्मिक लोक एकाच देवावर विश्वास ठेवतात आणि त्यामुळे गीतातील काही ओळी त्यांच्यासाठी म्हणणे अवघड ठरू शकते. ‘वंदे मातरम’मध्ये अनेक देव-देवतांचा संदर्भ येत असल्याने एकेश्वरवादी विचारसरणी असलेल्या व्यक्तींना ‘वंदे काली, वंदे दुर्गा’ म्हणणे कठीण जाऊ शकते, असे त्यांनी स्पष्ट केले.भारतातील सर्व धर्मांच्या लोकांना एकत्र आणायचे असेल, तर ‘वंदे मातरम’ची पहिली दोन कडवी योग्य ठरतील, असे मतही शर्मिला टागोर यांनी व्यक्त केले.
 
शर्मिला टागोर यांच्या वक्तव्याचा व्हिडिओ कंगना रणौत यांनी आपल्या इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर केला. ज्येष्ठ अभिनेत्रीच्या मताचा आदर करत असल्याचे सांगतानाच, कला आणि कवितेचा इतका मर्यादित अर्थ लावला जात असल्याबद्दल कंगनाने आश्चर्य व्यक्त केले. त्यांनी शर्मिला टागोर यांना “हिंदू-मुस्लिम मानसिकतेतून बाहेर या” असे आवाहन केले. कंगना रणौत यांच्या मते, कविता किंवा गाण्यांमध्ये वापरलेले शब्द अनेकदा रूपक, प्रतिमा आणि प्रतीकांच्या माध्यमातून व्यापक अर्थ व्यक्त करतात. त्यामुळे अशा कलाकृतींकडे केवळ धार्मिक चौकटीतून पाहणे योग्य नाही, असे त्यांनी म्हटले.