चिमुकल्या अंगदचा ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’मध्ये ऐतिहासिक ठसा

    दिनांक :21-Aug-2026
Total Views |

नागपूर

india book of records अवघ्या चार वर्षे ११ महिन्यांच्या अंगद पाटील या चिमुकल्याने आपल्या विलक्षण स्मरणशक्ती आणि भौगोलिक ज्ञानाच्या बळावर ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’मध्ये ऐतिहासिक विक्रमाची नोंद केली आहे. अंगदने तब्बल १५० देशांचे राष्ट्रीय ध्वज ओळखून त्या देशांची नावे आणि राजधानी अवघ्या ८ मिनिटे २० सेकंदांत सांगण्याची उल्लेखनीय कामगिरी केली. या विक्रमाची अधिकृतपणे नोंद करण्यात आली.
 
 
india book of records
 

फ्लॅश कार्ड्सच्या माध्यमातून अंगदने १५० देशांचे राष्ट्रीय ध्वज अचूकपणे ओळखले. त्यानंतर संबंधित देशाचे नाव आणि राजधानी सांगत त्याने ही संपूर्ण कामगिरी केवळ ८ मिनिटे २० सेकंदांत पूर्ण केली. एवढ्या कमी वयात इतक्या मोठ्या संख्येने देश, ध्वज आणि राजधानी लक्षात ठेवण्याची त्याची क्षमता विशेष कौतुकास्पद ठरली आहे. अंगद हा ॲड. तेजस पाटील आणि ॲड. रोहिणी पाटील यांचा मुलगा आहे. दोघेही मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात वकिली करतात. अंगदच्या या कामगिरीमुळे कुटुंबीयांमध्ये आनंदाचे वातावरण असून त्याच्या कौशल्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

 

 
यापूर्वीही केला विक्रम

अंगदची ही पहिलीच विक्रमी कामगिरी नाही. वयाच्या अवघ्या तीन वर्षे तीन महिन्यांचा असताना त्याने ५० देशांचे ध्वज ओळखून त्यांच्या राजधान्यांची नावे सांगण्याचा विक्रम केला होता. त्यानंतर सातत्याने केलेल्या सरावातून त्याने आपली कामगिरी आणखी उंचावत १५० देशांपर्यंत मजल मारली.