रक्षाबंधनासाठी घरी जाणार की फिरायला?

विमान-हॉटेल बुकिंगमध्ये मोठी उसळी

    दिनांक :21-Aug-2026
Total Views |
major surge in flight and hotel bookings 28 ऑगस्टला देशभरात रक्षाबंधन साजरे होणार असून, यंदा या सणामुळे प्रवासाच्या नियोजनात मोठी वाढ झाली आहे. रक्षाबंधनानंतर शनिवार आणि रविवार असल्याने अनेकांनी सलग सुट्ट्यांचा फायदा घेत छोट्या सहलींचे नियोजन केले आहे. त्यामुळे सणाआधीच विमान तिकिटे आणि हॉटेलच्या दरात वाढ झाल्याचे चित्र आहे.प्रवास बुकिंगच्या आकडेवारीत गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा मोठी वाढ दिसून आली आहे. लखनौमध्ये विमान बुकिंगमध्ये तब्बल 96 टक्के वाढ झाली आहे. भोपाळमध्ये 86 टक्के, इंदूरमध्ये 82 टक्के आणि रायपूरमध्ये 75 टक्के वाढ नोंदवली गेली आहे. पाटणामध्येही विमान बुकिंग 58 टक्क्यांनी वाढले आहे.रक्षाबंधनासाठी अनेकजण आपल्या कुटुंबीयांकडे परतण्याचे नियोजन करत असतानाच, काही प्रवासी या सुट्टीच्या काळात पर्यटनाला पसंती देत आहेत. त्यामुळे प्रमुख शहरांमधील हॉटेल बुकिंगमध्येही वाढ झाली आहे.
 
major surge in flight and hotel bookings
 
दिल्ली आणि उदयपूरमध्ये हॉटेल बुकिंग 83 टक्क्यांनी वाढले
गेल्या वर्षाच्या तुलनेत दिल्ली आणि उदयपूरमधील हॉटेल बुकिंगमध्ये 83 टक्क्यांची वाढ झाली आहे. याशिवाय हैदराबाद आणि बंगळूरु ही देखील प्रवाशांची पसंतीची ठिकाणे ठरत आहेत. वाढती मागणी लक्षात घेता या काळात हॉटेलच्या किमतीही वाढल्या आहेत.या बुकिंगमध्ये एक वेगळा ट्रेंडही समोर आला आहे. जवळपास 75 टक्के विमान तिकिटांचे बुकिंग एकट्याने प्रवास करणाऱ्या व्यक्तींनी केले आहे. मात्र, हॉटेल बुकिंगपैकी तब्बल 96.5 टक्के बुकिंग गटांकडून करण्यात आले आहे. यावरून अनेकजण विमानाने एकटे प्रवास करत असले तरी मुक्कामाच्या ठिकाणी कुटुंबीय किंवा मित्रांसोबत राहण्याचे नियोजन करत असल्याचे दिसते.

 
ओणममुळे केरळमध्येही पर्यटनाला वेग
रक्षाबंधनासोबतच ओणमच्या काळातही केरळमधील प्रवासाला मोठी मागणी आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत केरळमधील हॉटेल बुकिंगमध्ये 69 टक्क्यांची वाढ झाली आहे. बस प्रवासाच्या बुकिंगमध्ये तब्बल तिप्पट वाढ झाली असून, राज्यांतर्गत विमान बुकिंगमध्ये 6 टक्के वाढ नोंदवली गेली आहे.केरळमधील पर्यटनासाठी बंगळूर हे सर्वाधिक पसंतीचे शहर ठरले आहे. त्यानंतर दिल्ली, मुंबई, चेन्नई आणि हैदराबादचा क्रमांक लागतो. कोची आणि तिरुवनंतपुरममध्येही मोठ्या प्रमाणावर हॉटेल बुकिंग होत आहे. त्यामुळे रक्षाबंधन आणि लांब वीकेंडच्या पार्श्वभूमीवर देशातील पर्यटन आणि प्रवास क्षेत्रात मोठी हालचाल पाहायला मिळत आहे.