नवी दिल्ली,
Medhavi Bidhuri's celebration डब्ल्यूडीपीएल २०२६ मध्ये युवा क्रिकेटपटूंच्या दमदार कामगिरीसोबतच त्यांच्या हटके अंदाजाचीही चर्चा रंगू लागली आहे. २० ऑगस्ट रोजी झालेल्या महिला दिल्ली प्रीमियर लीगच्या पहिल्याच सामन्यात सेंट्रल दिल्ली क्वीन्सची अष्टपैलू खेळाडू मेधावी बिधुरीने विकेट घेतल्यानंतर केलेल्या अनोख्या सेलिब्रेशनने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले. तिच्या या सेलिब्रेशनचा व्हिडीओ सोशल मीडियावर काही वेळातच मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला.महिला दिल्ली प्रीमियर लीग २०२६ च्या सलामीच्या सामन्यात सेंट्रल दिल्ली क्वीन्स आणि साऊथ दिल्ली सुपरस्टार्स आमनेसामने होते. याच सामन्यात मेधावी बिधुरीने विकेट मिळवल्यानंतर मैदानावर एक वेगळाच अंदाज दाखवला. तिच्या या जल्लोषाची तुलना सध्या सोशल मीडियावर लोकप्रिय असलेल्या ‘Gen-Z’ स्टाईलशी केली जात आहे.
मेधावी बिधुरी सेंट्रल दिल्ली क्वीन्सकडून अष्टपैलू म्हणून खेळते. ती उजव्या हाताने फलंदाजी करते, तर लेग-ब्रेक गोलंदाजी करते. तिच्या या खास सेलिब्रेशनची कल्पना तिच्या बहिणीने दिल्याचे सोशल मीडियावरील एका पोस्टमध्ये सांगण्यात आले आहे.मेधावीच्या बहिणीला ‘Gen-Z’ स्टाईलमधील ट्रेंड आवडत असल्याने विकेट घेतल्यानंतर ६७ नंबरची जर्सी दाखवत खास सेलिब्रेशन करण्याची कल्पना तिने सुचवली. मेधावीनेही ही कल्पना मैदानावर प्रत्यक्षात उतरवली आणि तिच्या सेलिब्रेशनचा व्हिडीओ क्रिकेट चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय ठरला. दरम्यान, ‘6-7’ हा सध्या Gen-Z आणि सोशल मीडियावरील बोलचालीत वापरला जाणारा व्हायरल मीम किंवा विनोदी संदर्भ आहे. ‘सिक्स-सेव्हन’ या शब्दांसोबत विशिष्ट हातवारे करण्याचा हा ट्रेंड टिकटॉक आणि इन्स्टाग्रामसारख्या प्लॅटफॉर्मवर लोकप्रिय झाला आहे. त्यामागे कोणताही विशेष किंवा खोल अर्थ नसून तो प्रामुख्याने गंमतीच्या स्वरूपात वापरला जातो.