कारागृहातून सुटून बाहेर येताच कुख्यात गुन्हेगाराचा खात्मा

आरोपीला अटक: पूर्व वैमनस्यातून खून

    दिनांक :21-Aug-2026
Total Views |
अनिल कांबळे
 
नागपूर,
narendranagar bridge murder कारागृहातून नुकताच बाहेर पडलेल्या एका कुख्यात गुन्हेगाराची नरेंद्रनगर पुलाजवळ भरचौकात हत्या करण्यात आली. ही घटना गुरुवारी सायंकाळी उघडकीस आली. या घटनेमुळे शहरातील कायदा-सुव्यवस्थेच्या स्थितीवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मृताची ओळख अजनी येथील रहिवासी गौरव पंकज रगडे (२५) अशी झाली आहे. या हत्येप्रकरणी यवतमाळ येथील रहिवासी गौरव रामजी राऊत याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

narendranagar bridge murder
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गौरव रगडे हा कुख्यात गुन्हेगार असून याच्याविरुद्ध अजनी पोलिस ठाण्यातच सुमारे १० गुन्हे दाखल आहेत. काही दिवसांपूर्वीच तो कारागृहातून बाहेर आला होता. गुरुवारी सायंकाळी सुमारे ६ वाजताच्या सुमारास नरेंद्रनगर पुलाजवळ आरोपीने रगडे याला अडवले. त्यानंतर राऊत याने धारदार शस्त्राने त्याच्यावर हल्ला केला. ऐन गर्दीच्या वेळी आणि भररस्त्यात हा हल्ला झाल्याने अनेक वाहनचालक व नागरिकांनी ही घटना प्रत्यक्ष पाहिली. हल्ल्याचे व्हिडीओही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात प्रसारित झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच बेलतरोडी आणि अजनी पोलिस ठाण्याचे पथक तसेच गुन्हे शाखेचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले.
पोलिसांनी तातडीने आरोपीचा शोध सुरू केला. काही वेळातच गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपीला ताब्यात घेतले. हत्येमागील नेमके कारण काय, याचा पोलिस तपास करीत आहेत. तसेच या हत्येत आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचीही चौकशी सुरू आहे. भरदिवसा झालेल्या या हत्येमुळे नागपूरच्या कायदा-सुव्यवस्थेवर पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. नागरिकांनी या घटनेबाबत चिंता व्यक्त केली असून, शहरातील गुन्हेगारीवर अधिक प्रभावीपणे नियंत्रण ठेवण्याची मागणी होत आहे.