रेवंत रेड्डींना अमेरिकेत ‘नो एन्ट्री’!

यूएस दौऱ्याला मंजुरी नाकारली

    दिनांक :21-Aug-2026
Total Views |
नवी दिल्ली,
no entry for revanth reddy in the us तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्या प्रस्तावित अमेरिका दौऱ्याला केंद्र सरकारकडून मंजुरी मिळालेली नाही. या प्रकरणावर परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयसवाल यांनी नियमित पत्रकार परिषदेत भूमिका स्पष्ट केली. मुख्यमंत्र्यांसह वरिष्ठ पदांवरील व्यक्तींच्या परदेश दौऱ्यांसाठी परराष्ट्र मंत्रालयाकडून राजकीय मंजुरी दिली जाते. दौऱ्याचा उद्देश आणि संबंधित पद लक्षात घेऊन प्रस्तावित कार्यक्रम योग्य आहे की नाही, याचा विचार केला जातो, असे जयसवाल यांनी सांगितले.रणधीर जयसवाल यांच्या म्हणण्यानुसार, रेवंत रेड्डी यांच्या अमेरिका दौऱ्याचा प्रस्ताव पद आणि दौऱ्याच्या उद्देशाच्या दृष्टीने आवश्यक निकषांशी जुळत नसल्याने त्याला राजकीय मंजुरी देण्यात आली नाही. मात्र, त्यांच्या ब्रिटन दौऱ्याला परराष्ट्र मंत्रालयाने परवानगी दिली होती, असेही त्यांनी स्पष्ट केले.

no entry for revanth reddy in the us
 
रेवंत रेड्डी यांच्या नेतृत्वाखालील अधिकृत ‘तेलंगाना-राइजिंग’ प्रतिनिधी मंडळ सध्या लंडनमध्ये आहे. नियोजित कार्यक्रमानुसार ब्रिटन दौरा पूर्ण केल्यानंतर मुख्यमंत्री अमेरिकेतील बोस्टनला जाणार होते आणि ३० ऑगस्ट रोजी हैदराबादला परतण्याचे नियोजन होते. मात्र, अमेरिकेच्या दौऱ्याला मंजुरी न मिळाल्याने हा कार्यक्रम रद्द करण्यात आला.तेलंगाना मुख्यमंत्री कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, राज्य सरकारने धोरण आणि प्रोटोकॉलनुसार ब्रिटन तसेच अमेरिकेच्या दौऱ्यासाठी केंद्राकडे परवानगी मागितली होती. त्यापैकी केवळ ब्रिटनच्या दौऱ्याला मंजुरी मिळाली. अधिकृत प्रतिनिधी मंडळ ब्रिटनमध्ये पोहोचल्यानंतर अमेरिकेच्या दौऱ्यासाठी परवानगी नाकारण्यात आल्याची माहिती राज्य सरकारला देण्यात आली.
 
अमेरिकेच्या दौऱ्याला परवानगी न मिळाल्यामुळे रेवंत रेड्डी आता बोस्टनला न जाता २३ ऑगस्ट रोजी लंडनहून हैदराबादला परतणार आहेत. ‘तेलंगाना राइजिंग’च्या माध्यमातून राज्याचा विकास, शिक्षण क्षेत्रातील प्रगती आणि ‘विकसित भारत’मध्ये योगदान देण्याच्या उद्देशाने हा दौरा आखण्यात आला होता. अमेरिका दौऱ्याला राजकीय कारणांमुळे मंजुरी न मिळाल्याने मुख्यमंत्री रेवंत रेड्डी आश्चर्यचकित असल्याचे मुख्यमंत्री कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे. मात्र, परराष्ट्र मंत्रालयाने दौऱ्याच्या प्रस्तावाला आवश्यक निकषांची पूर्तता होत नसल्याने राजकीय मंजुरी देण्यात आली नसल्याचे स्पष्ट केले आहे.