अनिल कांबळे
नागपूर,
daga hospital नागपूर शहरातील तहसील पोलिस ठाण्याच्या हद्दीतील रुग्णालयातून एक दिवस वय असलेले नवजात बाळ एका महिलेने चोरी केले. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. डागा रुग्णालयातून एका महिलेने नवजात बाळाला घेऊन गेल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. तहसील पोलिसांनी पोलिसांचे दोन पथके तयार करुन बाळाचा आणि संशयित महिलेचा शोध सुरु केला आहे. घटनेची माहिती मिळताच तहसील पोलिसांनी प्रकरणाची गंभीर दखल घेत तपासाला सुरुवात केली आहे.
आज शुक्रवारी दुपारी डागा रुग्णालयातून एका दिवसाचे बाळ एका संशयित महिलेने चोरी केले आणि पळून गेली. ही घटना उघडकीस येताच एकच खळबळ उडाली. बाळाच्या आई वडिलांनी लगेच पोलिस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांना माहिती मिळताच लगेच गांभीर्य दाखवून बाळ आणि संशयित महिलेचा शोध घेणे सुरु केले. नवजात बाळ नेमकी कोणाच्या ताब्यात आहे, तिला रुग्णालयातून कशा पद्धतीने बाहेर नेण्यात आले आणि या घटनेमागे आणखी कोणाचा सहभाग आहे का?, याचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे.
रुग्णालय परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, प्रवेश-निर्गमन मार्ग तसेच संशयित व्यक्तींच्या हालचालींची माहिती पोलिसांकडून तपासली जाण्याची शक्यता आहे. बाळाचा तातडीने शोध घेण्यासाठी गुन्हे शाखेची पथके सक्रिय करण्यात आल्याची माहिती आहे. दरम्यान, एक दिवसाच्या नवजात बाळाच्या चोरीची माहिती समोर आल्याने रुग्णालय परिसरातही चिंता आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेमुळे रुग्णालयातील सुरक्षा व्यवस्थेवरही गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पोलिसांकडून सध्या वेगाने तपास सुरू असून, नवजात बाळाच्या नातेवाईकांकडून माहिती घेण्यात येत आहे.