विद्यार्थ्यांसह भंडारेकर पाण्यासाठी पायी पायी...

जलसंधारणाच्या ‘वॉकथॉनङ्कला उत्स्फुर्त प्रतिसाद!

    दिनांक :21-Aug-2026
Total Views |
भंडारा,
water conservation walkathon सकाळची झोप सगळ्यांनाच प्रिय असते, विशेष करून विद्यार्थ्यांना! मग सकाळी उठून एखाद्या कार्यक्रमासाठी येण्याची अपेक्षा करणे तसे धाडसाचेच. पण आज जलसंधारणाचा विषय घेऊन आयोजिलेल्या वॉकथान मधील विद्यार्थ्यांचा आणि नागरिकांचा सहभाग पाहता जलसंधारणाची गरज अधोरेखित झाली! आज विद्यार्थी पाण्यासाठी पायी चालले, हीच जाणीव ठेवून भविष्यात जलसंधारण आणि पुनर्भरणासाठी कृती झाल्यास आयोजनाची फलश्रुती ठरेल.राज्याचे दिवंगत मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांच्या जयंतीचे औचित्य साधून २१ ऑगस्ट हा जलसंधारण दिन साजरा केला जातो. या निमित्य राज्यातील नागरिकांमध्ये जलसंधारणाच्या विषयी जनजागृती यावी हेतूने ‘वॉक फॉर वॉटर ‘ वॉकथॉनचे आयोजन करण्यात आले होते.
 
 
water conservation walkathon
 
भंडाराही त्याला अपवाद नव्हता. भंडारा जिल्हा प्रशासनाच्या वतीने यासाठी पुढाकार घेत आज हे आयोजन केले. येथील दसरा मैदान येथून वॉकथॉनला सुरुवात झाली. विविध शाळांचे असंख्य विद्यार्थी, सर्वसामान्य नागरिक नोंदणी करून या आयोजनात सहभागी झाले होते. सकाळच्या वेळी तरीही दैनंदिन कार्यक्रमांना बाजूला ठेवून या आयोजनात सहभागी होऊन आठ ते दहा किलोमीटर पायी चालणाऱ्या या विद्यार्थी आणि नागरिकांनी आपल्या कृतीतून जलसंधारणाचे महत्त्व पटवून दिले असेच म्हणता येईल. आज पुनर्भरणाची गरज काय? हे ज्यांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागते, ते चांगल्या पद्धतीने सांगू शकतात. अशावेळी प्रत्येक नागरिकांनी ही आपली जबाबदारी समजून वागल्यास कदाचित पाण्यासाठी जाणारे जीवही वाचू शकतील.
 
आज ज्या उत्साहात भंडारेकर या आयोजनात सहभागी होऊन पायी चालले, त्यावरून भविष्यातील जल संकटाच्या चाहूलीची जाणीव त्यांनाही झाल्याचे दिसते. बदल घडवण्याची क्षमता तरुण पिढीत आहे. तरुणांचा या आयोजनातील सहभाग नक्कीच सकारात्मक विचार करण्यास भाग पाडणारा आहे. ज्या उत्साहाने हे तरुण विद्यार्थी पाण्यासाठी चालले, भविष्यात हीच कळकळ कृतीतून दिसावी व जल पुनर्भरणाचे प्रयोग घरोघरी व्हावेत, अशी अपेक्षा केलीच जाऊ शकते. भंडाऱ्याचे आ. नरेंद्र भोंडेकर, तुमसरचे आ. राजू कारेमोरे, नगराध्यक्षा मधुरा मदनकर यांच्यासह अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून सहभागी असलेल्यांचा उत्साह वाढविला. तेही त्याच्यासोबत पाण्यासाठी चालले.