लीमा,
earthquake in peru पेरूच्या दक्षिण अँडीज पर्वतरांगांमध्ये गुरुवारी ६.७ तीव्रतेच्या शक्तिशाली भूकंपाने जमीन हादरली. अमेरिकेच्या यूएस जिओलॉजिकल सर्व्हेच्या माहितीनुसार, स्थानिक वेळेनुसार दुपारी १ वाजण्याच्या सुमारास हा भूकंप झाला. भूकंपाचा केंद्रबिंदू आयाकुचो प्रदेशातील पारिनाकोचास प्रांतातील उपाहुआचो शहराच्या वायव्येस ३८ किलोमीटर अंतरावर आणि जमिनीखाली ६६.७ किलोमीटर खोलीवर होता.
भूकंपाचे हादरे पेरूच्या दक्षिणेकडील अनेक भागांमध्ये जाणवले. इका आणि अरेक्विपा प्रदेशातील नागरिकांनाही भूकंपाचे धक्के जाणवले. सुरुवातीच्या माहितीनुसार, मोठ्या प्रमाणावर जीवित किंवा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही. मात्र, काही ठिकाणी दोन जण जखमी झाल्याची आणि शाळा, घरे तसेच रुग्णालयांच्या इमारतींचे किरकोळ नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे. भूकंपाची खोली अधिक असल्यामुळे त्याची तीव्रता जाणवूनही मोठ्या प्रमाणावर विध्वंस टळल्याचे सांगितले जात आहे. पेरू प्रशांत महासागराच्या किनाऱ्यावर असल्याने त्सुनामीचा धोका निर्माण होण्याची शक्यता असते; मात्र या भूकंपानंतर त्सुनामीचा कोणताही इशारा जारी करण्यात आलेला नाही.