नवी दिल्ली
modis-25-year-political-journey पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सार्वजनिक जीवनातील कारकिर्दीला 25 वर्षे पूर्ण होणार आहेत. हा महत्त्वाचा टप्पा साजरा करण्यासाठी, भाजपा देशव्यापी सेवा संकल्प महोत्सव साजरा करणार आहे. पक्षातर्फे ही देशव्यापी जनसंपर्क मोहीम राहणार आहे.
7 ऑक्टोबर 2001 रोजी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून प्रथम पदभार स्वीकारल्यापासून पंतप्रधान मोदी राजकारणात अखंड सक्रिय आहेत. त्यांनी जवळपास 13 वर्षे गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून आणि त्यानंतर गेल्या 12 वर्षांपासून देशाचे पंतप्रधान म्हणून काम पाहिले आहे.
पक्षाचे सर्वोच्च नेतृत्व या महोत्सवाची रूपरेषा निश्चित करण्यात पूर्णपणे व्यस्त आहेत. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन शनिवारी मोहिमेच्या तयारीचा सविस्तर आढावा घेणार आहेत. या महत्त्वाच्या बैठकीसाठी सर्व प्रदेशाध्यक्ष, संघटनांचे सरचिटणीस, राज्य प्रभारी आणि सह-प्रभारी यांना आमंत्रित करण्यात आले आहे. तळागाळापर्यंत उत्तम समन्वय साधणे हा यामागील उद्देश आहे.
विनोदी तावडे यांच्यावर जबाबदारी
या राष्ट्रीय मोहिमेचे प्रभावी व्यवस्थापन करण्यासाठी विनोद तावडे यांची राष्ट्रीय समन्वयक म्हणून नियुक्ती केली आहे. प्रत्येक राजेयात एक सात सदस्यीय समिती तयार केली जाईल, ज्यात एक राज्यमंत्री, एक संघटन सरचिटणीस आणि इतर पाच ज्येष्ठ नेते असतील. ही समिती आपआपल्या प्रदेशात कार्यक्रमांच्या अंमलबजावणीवर देखरेख करेल.
सेवा आणि विकासाचा पंधरवडा
सेवा संकल्प महोत्सवांतर्गत, देशभरात सुमारे 15 दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाईल. पंतप्रधान मोदींच्या 25 वर्षांच्या सेवेचा आणि त्यांच्या विकासकामांचा संदेश सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविणे हा या कार्यक्रमांचा उद्देश असेल. स्वच्छता मोहीम आणि रक्तदान शिबिरांसोबतच मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण मोहीम आयोजित केली जाईल. जनतेसाठी आरोग्य तपासणी शिबिरे आयोजित केली जातील.