यंदा भद्रा नाही मात्र राहुकाळात राखी बांधू नका

    दिनांक :21-Aug-2026
Total Views |
Rakhi during Rahukal यंदा रक्षाबंधनाचा सण 28 ऑगस्ट 2026 रोजी साजरा केला जाणार आहे. श्रावण पौर्णिमेला येणाऱ्या या सणाची भाऊ-बहिणी आतुरतेने वाट पाहत असतात. बहिण भावाच्या मनगटावर राखी बांधून त्याच्या सुख, आरोग्य, समृद्धी आणि दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते. त्यामुळे राखी बांधताना शुभ मुहूर्ताला धार्मिक परंपरेत विशेष महत्त्व दिले जाते.
 
 
Rakhi during Rahukal
 
पंचांगानुसार श्रावण शुक्ल पौर्णिमा तिथी 27 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 9:07 वाजता सुरू होईल आणि 28 ऑगस्ट रोजी सकाळी 9:48 वाजता समाप्त होईल. महाराष्ट्रातील पंचांगानुसार 28 ऑगस्ट रोजी राखी बांधण्यासाठी सकाळी 5:57 ते 9:48 असा शुभ कालावधी सांगण्यात आला आहे. म्हणजेच बहिणींना राखी बांधण्यासाठी एकूण 3 तास 51 मिनिटांचा वेळ मिळणार आहे. शहरानुसार या वेळेत काही मिनिटांचा फरक पडू शकतो. त्यामुळे स्थानिक पंचांगाला प्राधान्य देण्याचा सल्ला दिला जातो.
 
 
28 ऑगस्ट रोजी सकाळी 11 ते दुपारी 12:40 या कालावधीत राहुकाळ असल्याचे सांगण्यात आले आहे. धार्मिक मान्यतेनुसार राहुकाळ शुभ कार्यांसाठी अनुकूल मानला जात नसल्याने या वेळेत राखी बांधणे टाळावे, असा सल्ला दिला जातो. त्यामुळे सकाळच्या शुभ वेळेतच रक्षाबंधनाचा विधी पूर्ण करणे योग्य मानले जाते.रक्षाबंधनाच्या दिवशी भद्रा काळाची अडचण नसणार आहे. पंचांगानुसार भद्रा 27 ऑगस्ट रोजी सकाळी 9:08 वाजता सुरू होऊन रात्री 9:32 वाजता समाप्त होईल. त्यामुळे 28 ऑगस्ट रोजी रक्षाबंधन साजरे करताना भद्रा काळाचा अडथळा राहणार नाही.दरम्यान, यावर्षीचे शेवटचे चंद्रग्रहणही रक्षाबंधनाच्या दिवशी होणार आहे. मात्र हे ग्रहण भारतातून दिसणार नसल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे त्याचा सूतक काळ लागू होणार नाही आणि रक्षाबंधनाच्या सणावर त्याचा परिणाम होणार नसल्याचे पंचांगानुसार नमूद करण्यात आले आहे.