नागपूर,
Significant verdict by the Nagpur Bench रेल्वेत चढताना तोल जाऊन झालेल्या अपघाती मृत्यूला भरपाईच्या कक्षेबाहेर ठेवता येणार नाही, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला आहे. अपघाताचा प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नसल्याच्या कारणावरून भरपाई नाकारता येणार नसल्याचेही न्यायालयाने स्पष्ट केले. यवतमाळ येथील अंकुश अशोक निमकर यांच्या मृत्यूच्या प्रकरणात त्यांच्या आईला 8 लाख रुपये भरपाई देण्याचे आदेश न्यायालयाने रेल्वे प्रशासनाला दिले आहेत. ही रक्कम तीन महिन्यांच्या आत देण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.अंकुश अशोक निमकर यांचा 14 मे 2023 रोजी मूर्तीजापूर रेल्वेस्थानकावर अपघाती मृत्यू झाला होता. रेल्वे पकडताना तोल जाऊन प्रवासी रेल्वेच्या चाकाखाली येण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले. त्यामुळे या घटनेला भरपाईच्या दाव्यापासून वगळता येणार नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.
रेल्वेत चढण्याच्या प्रक्रियेदरम्यान झालेला अपघातही ‘अनपेक्षित रेल्वे घटना’ ठरू शकतो, असे न्यायालयाने म्हटले. तसेच ‘रेल्वेतून पडणे’ या तरतुदीचा अत्यंत संकुचित अर्थ लावता येणार नाही, असेही स्पष्ट करण्यात आले.या प्रकरणात रेल्वे दावा न्यायाधिकरणाने भरपाईचा दावा फेटाळला होता. मात्र, उपलब्ध पुराव्यांच्या आधारे अपघाताचा निष्कर्ष काढता येतो, असे उच्च न्यायालयाने नमूद केले. प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नसणे हे भरपाई नाकारण्याचे एकमेव कारण ठरू शकत नाही, असा निष्कर्ष सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा आधार घेत न्यायालयाने काढला. त्यानंतर मृताच्या आईच्या बाजूने निकाल देत रेल्वे प्रशासनाला 8 लाख रुपये भरपाई देण्याचे आदेश देण्यात आले.
दरम्यान, नागपुरातील आणखी एका प्रकरणात अल्पवयीन मुलाला कार चालवायला दिल्याच्या आरोपावरून त्याच्या पालकांना अतिरिक्त सत्र न्यायालयाने मोठा धक्का दिला आहे. मित्राच्या वाढदिवसाला जात असताना अल्पवयीन मुलाच्या कारला अपघात झाला होता. या दुर्घटनेत दोन अल्पवयीन मुलांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात पालकांनी दाखल केलेला अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला.घरातील सीसीटीव्ही फुटेज आणि सोशल मीडिया सामग्री हटवण्यात आल्याचा पोलिसांचा दावा आहे. त्यामुळे पुरावे नष्ट करण्याचा किंवा त्यात फेरफार करण्याचा संशय व्यक्त करत न्यायालयाने जामीन नाकारला. तपासाच्या प्राथमिक टप्प्यात पालकांची चौकशी आवश्यक असल्याचेही न्यायालयाने नमूद केले.
पोलिसांच्या तपासानुसार, गेल्या वर्षभरापासून अल्पवयीन मुलगा कार चालवत होता आणि त्याला वाहन चालवता येत असल्याची माहिती पालकांना होती. मात्र, मुलाने पालकांच्या परवानगीशिवाय कार नेल्याचा दावा पालकांनी न्यायालयात केला. तपास यंत्रणेने मात्र मुलाला वाहन चालवण्याची मुभा दिल्याचा आरोप केला आहे. 12 ऑगस्टला पहाटे टाटा कर्व्ह कारची ट्रकला धडक होऊन भीषण अपघात झाला. कार चालवणारा अल्पवयीन मुलगा जखमी झाला, तर त्याच्यासोबत असलेल्या दोन मित्रांचा मृत्यू झाला. या प्रकरणी कळमना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपासावर परिणाम होण्याची शक्यता लक्षात घेत न्यायालयाने पालकांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला.