naddas direct question to rahul gandhi काँग्रेसचे नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पेलेट गन प्रकरणी एफआयआर दाखल करण्याच्या मागणीसाठी दिल्लीतील पार्लमेंट स्ट्रीट पोलीस ठाण्यासमोर धरणे आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनावरून भाजपच्या नेत्यांनी राहुल गांधी आणि काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री जेपी नड्डा यांनी राहुल गांधींच्या आंदोलनाला ‘लक्ष विचलित करण्याचे राजकारण’ आणि ‘नाटक’ असे संबोधत काँग्रेसवर निशाणा साधला.
राहुल गांधी याआधीही विद्यार्थी आंदोलनाच्या मुद्द्यावरून आंदोलनात सहभागी झाले होते. सुमारे महिनाभरापूर्वी दिल्लीतील जंतर मंतर येथे विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनादरम्यान पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला होता. त्याच्या निषेधार्थ राहुल गांधी यांनी २१ जुलै रोजी धरणे आंदोलन केले होते. त्यानंतर त्यांनी पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेरही आंदोलन केले होते. आता २१ ऑगस्ट रोजी पेलेट गन प्रकरणात एफआयआर दाखल करण्याच्या मागणीसाठी त्यांनी पार्लमेंट स्ट्रीट पोलीस ठाण्याबाहेर धरणे धरले आहे.
नड्डांचा राहुल गांधींवर जोरदार प्रहार
राहुल गांधींच्या आंदोलनावर प्रतिक्रिया देताना जेपी नड्डा यांनी काँग्रेसवर राजकीय हताशा आणि प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला. या प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयात चौकशी सुरू असताना राहुल गांधी पोलीस ठाण्याबाहेर कॅमेऱ्यांसमोर आंदोलन का करत आहेत, असा सवाल नड्डांनी उपस्थित केला. नड्डा यांनी राहुल गांधींवर कॅमेऱ्यांचे आकर्षण असल्याची टीका करत त्यांच्या आंदोलनाला राजकीय नाटकाची उपमा दिली. काँग्रेस वंदे मातरमच्या मुद्द्यावर अडचणीत आल्याचा दावा करत, जनतेचे लक्ष त्या विषयापासून हटवण्यासाठी राहुल गांधी नव्या आंदोलनाचा आधार घेत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
‘संसदेत चर्चा करण्याचे धाडस नाही’
केंद्र सरकार संसदेत विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यास तयार होते, मात्र राहुल गांधी संसदेत प्रश्न उपस्थित करण्याऐवजी रस्त्यावर आंदोलन करत असल्याचा आरोप नड्डांनी केला. देशातील प्रश्न आणि वाद न्यायिक प्रक्रियेतून सोडवले जातात, हट्टीपणातून नाही, असेही त्यांनी म्हटले. राहुल गांधींनी जनतेसमोर आपल्या भूमिकेचे स्पष्टीकरण द्यावे लागेल, असा दावा करत नड्डांनी काँग्रेसच्या राजकारणावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
रविशंकर प्रसाद यांचीही टीका
भाजपचे खासदार रविशंकर प्रसाद यांनीही राहुल गांधींच्या आंदोलनावर टीका केली. विरोधी पक्षनेत्याकडून लोकशाहीच्या मार्गाने राजकारण होण्याची अपेक्षा असताना ते अराजकतेचे राजकारण करत असल्याचा आरोप त्यांनी केला. कोणतीही पूर्वसूचना न देता दिल्लीतील पार्लमेंट स्ट्रीटवर धरणे आंदोलन करण्यात आल्याचेही प्रसाद यांनी म्हटले. काँग्रेसच्या वंदे मातरमवरील भूमिकेमुळे पक्ष अडचणीत सापडला असल्याचा आरोपही त्यांनी केला.
स्मृती इराणींचाही राहुल गांधींवर निशाणा
माजी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनीही राहुल गांधींच्या आंदोलनावरून काँग्रेसला लक्ष्य केले. देशाच्या निमलष्करी दलांविरोधात एफआयआर दाखल करण्याच्या मागणीसाठी राहुल गांधी पोलीस ठाण्याबाहेर आंदोलन करत असल्याचे त्यांनी म्हटले. देशाच्या सुरक्षेसाठी कार्यरत असलेल्या सैनिकांच्या भूमिकेवर यापूर्वीही राहुल गांधींनी प्रश्न उपस्थित केल्याचा आरोप इराणी यांनी केला.
‘आंदोलन करणे हा प्रत्येकाचा अधिकार’
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी राहुल गांधींच्या आंदोलनाबाबत वेगळी भूमिका मांडली. लोकशाही व्यवस्थेत आंदोलन करण्याचा अधिकार प्रत्येकाला असल्याचे त्यांनी सांगितले. तरुणांच्या प्रश्नांकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी संवेदनशीलतेने पाहत असून त्यांच्या मागण्या आणि अपेक्षा पूर्ण करण्यासाठी सरकारकडून प्रयत्न केले जात असल्याचे पटेल यांनी म्हटले. तरुणांच्या प्रश्नांवर सरकारने लक्ष दिले असल्याचे सांगताना धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा हीदेखील सरकारने घेतलेल्या महत्त्वाच्या निर्णयांपैकी एक असल्याचे प्रफुल्ल पटेल यांनी नमूद केले.