चेन्नई,
Sowcar Janaki's health condition is critical प्रसिद्ध भारतीय अभिनेत्री आणि पद्मश्री पुरस्कार विजेत्या सौकार जानकी यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे. ९४ वर्षीय सौकार जानकी यांची अचानक प्रकृती खालावल्याने त्यांना चेन्नईतील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांच्यावर अतिदक्षता विभागात डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत. त्यांच्या प्रकृतीची माहिती समोर आल्यानंतर मनोरंजन क्षेत्रात तसेच त्यांच्या चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. सोशल मीडियासह विविध माध्यमांतून त्यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी यासाठी प्रार्थना केली जात आहे.
सौकार जानकी यांचा जन्म १२ डिसेंबर १९३१ रोजी एका कन्नड कुटुंबात झाला. दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतील अत्यंत आदरणीय आणि प्रतिष्ठित अभिनेत्री म्हणून त्यांची ओळख आहे. दशकांहून अधिक काळाच्या कारकिर्दीत त्यांनी आपल्या अभिनयाची वेगळी छाप उमटवली. तमिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम या चारही भाषांमधील चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले असून, त्यांच्या नावावर ४५० हून अधिक चित्रपट आहेत. चित्रपटांसोबतच त्यांनी ३०० हून अधिक नाटकांमध्येही सहभाग घेतला आहे. सौकार जानकी यांनी दिग्दर्शक एल. व्ही. प्रसाद यांच्या ‘शवुकारू’ या तेलगू चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवले. हा चित्रपट मोठ्या प्रमाणावर यशस्वी ठरल्यानंतर त्यांना ‘सौकार’ हे टोपणनाव मिळाले आणि पुढे तेच नाव त्यांच्या ओळखीचा अविभाज्य भाग बनले. त्यानंतर १९५२ मध्ये ‘वलैयापथी’ या चित्रपटातून त्यांनी तमिळ चित्रपटसृष्टीत प्रवेश केला.