नागपूर,
state level ganeshotsav राज्य सरकारने गणेशोत्सवाला ‘राज्य महोत्सव’ म्हणून घोषित केले आहे. विशेष म्हणजे आता हा महोत्सव केवळ सांस्कृतिक विभागापुरता मर्यादित राहिलेला नाही, तर विविध मंत्रालयीन विभाग, त्यांची अधिनस्त कार्यालये, महामंडळे तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सहभागातून विविध कार्यक्रम व उपक्रम राबविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे आता गणेशोत्सव सर्व विभागांचा झाला आहे. ४८० सार्वजनिक गणेश मंडळांना पुरस्कार सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना प्रोत्साहन देण्यासाठी तालुका, जिल्हा आणि राज्यस्तरावर स्पर्धा घेण्यात येणार आहेत. सुमारे ४८० सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना सुमारे १.५० कोटी रुपयांची पारितोषिके वितरित करण्याची तरतूद करण्यात आली आहे.
डिजिटल प्लॅटफॉर्म विकसित करण्याची सूचना
गणेशोत्सवानिमित्त राज्य व्याख्यानमालेचे आयोजन, प्रमुख गणेश मंदिरांचे आणि सार्वजनिक गणेशोत्सवांचे ऑनलाईन दर्शन घडविण्यासाठी पोर्टल तसेच घरगुती गणेशोत्सवाची छायाचित्रे अपलोड करता यावीत यासाठी डिजिटल प्लॅटफॉर्म विकसित करण्याची सूचनाही करण्यात आली आहे.
३६ जिल्ह्यांपासून देश-विदेशात सांस्कृतिक कार्यक्रम
सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत राज्यातील सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये गणेशोत्सवानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत. महाराष्ट्राबाहेरील १० राज्यांत, भारताबाहेरील एका देशात, तसेच नवी दिल्ली येथे पाच दिवस आणि मुंबईत आठ दिवस सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. दादासाहेब फाळके चित्रनगरीच्या माध्यमातून राज्यभर गणपतीविषयक ‘रील्स’ स्पर्धाही घेण्यात येणार आहे.
गावांपासून शहरांपर्यंत पर्यावरणाचा जागर
ग्रामपंचायतींच्या माध्यमातून स्वच्छता, वृक्षारोपण आणि प्लॅस्टिकमुक्त गणेशोत्सवाबरोबरच कृत्रिम विसर्जन तलाव उभारण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. शाडूच्या मातीच्या मूर्ती, बीज गणपती, निर्माल्य संकलन व पुनर्वापर तसेच प्लॅस्टिकमुक्त गणेशोत्सवासाठी राज्यव्यापी जनजागृती मोहीम राबविण्यात येणार आहे.
शेतकरी, बचतगट आणि कारागिरांनाही संधी
राज्य महोत्सवाचा लाभ स्थानिक अर्थव्यवस्थेलाही मिळावा, यासाठी विविध विभागांना स्वतंत्र जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत. कृषी विभागाने स्थानिक शेतकऱ्यांच्या सहभागातून फुले, दूर्वा, नैवेद्य साहित्य, सेंद्रिय कृषी उत्पादने आणि पारंपरिक कृषी संस्कृतीची माहिती प्रसारित करावी. सहकार विभागाने महिला बचतगट व सहकारी संस्थांना मोदक, प्रसाद साहित्य आणि स्थानिक उत्पादनांच्या विक्रीस प्रोत्साहन द्यावे. उद्योग विभागाने गणेशमूर्ती, मखर, सजावट व पूजा साहित्य तयार करणाऱ्या एमएसएमई उद्योग आणि कारागिरांसाठी प्रोत्साहनात्मक उपक्रम राबवावेत. वस्त्रोद्योग विभागाकडून पैठणी, खण, नऊवारी, फेटे यांसारख्या पारंपरिक वस्त्रांची माहिती प्रसारित करण्याचे निर्देश आहेत. ऊर्जा विभागाने मंडळांना वीज जोडणीची प्रक्रिया सुलभ करण्यासोबतच एलईडी सजावट आणि सौर ऊर्जेवर आधारित गणेश मंडपांना प्रोत्साहन देण्यासह आदिवासी कलाकारांची लोककला व हस्तकलेवर आधारित सांस्कृतिक कार्यक्रमांना प्रोत्साहन देण्यात येणार आहे.
‘गणेश आणि विज्ञान’
महाविद्यालयांमध्ये ‘गणेश आणि विज्ञान’ विषयावरील परिसंवाद, व्याख्याने आणि नवोपक्रम प्रदर्शन, तसेच अभियांत्रिकी विद्यार्थ्यांच्या माध्यमातून मंडळांना नावीन्यपूर्ण रोबोटिक्स देखावे सादर करण्यास प्रोत्साहन दिले जाणार आहे. मराठी भाषेच्या संवर्धनासाठी गणेशावरील काव्य वाचन, निबंध, वक्तृत्व, कथाकथन आणि सुलेखनाला प्रोत्साहन देण्यात येणार आहे. देशातील तसेच परदेशातील मराठी मंडळांनाही गणेशोत्सवात सहभागी करून घेण्याचे नियोजन आहे.
पर्यटनाच्या नकाशावर महाराष्ट्राचा गणेशोत्सव
राज्य महोत्सवाच्या माध्यमातून देशी-विदेशी पर्यटकांना महाराष्ट्राच्या गणेशोत्सवाची माहिती व्हावी, यासाठी पर्यटन विभागाने आवश्यक उपक्रम राबवावेत, असे निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे धार्मिक आणि सांस्कृतिक उत्सवाबरोबरच महाराष्ट्राच्या पर्यटनाला चालना देणारा महोत्सव म्हणून गणेशोत्सवाची ओळख अधिक व्यापक करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे.