अनिल कांबळे
नागपूर,
theft at ambika devi temple इतवारी येथील अंबिका देवी मंदिरात अज्ञात चोरट्याने दानपेटी फोडली आणि त्यातील सुमारे ७० हजार रुपयांची रोकड लंपास केली. चोरट्याने मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराची कडी तोडून आत प्रवेश केला. ही घटना मध्यरात्री भाजी मंडई परिसरात, तहसील पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली.
मंदिराचे व्यवस्थापक रतीलाल राऊत (६०) यांनी याबाबत तहसील पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीनुसार, १८ ऑगस्ट रोजी रात्री नेहमीप्रमाणे पूजाविधी आटोपल्यानंतर रात्री सुमारे १० वाजता मंदिराला कुलूप लावून ते घरी गेले. दरम्यान, १९ ऑगस्ट रोजी पहाटे सुमारे ४.३५ वाजता परिसरातील रहिवासी प्रभात आवथनकर यांनी राऊत यांना फोन करून मंदिराचा मुख्य दरवाजा उघडा असल्याचे सांगितले. दरवाजाची कडी तुटलेली दिसत असून मंदिरातील दानपेटीचीही तोडफोड झाल्याचे त्यांनी सांगितले. माहिती मिळताच राऊत यांनी मंदिरात धाव घेतली. त्यावेळी मुख्य प्रवेशद्वाराची कडी तुटलेली, तर लोखंडी दानपेटीचे कुलूप तोडून ती उघडल्याचे आढळून आले.
दानपेटीतील भक्तांनी अर्पण केलेली अंदाजे ७० हजार रुपयांची रोकड गायब होती. चोरट्याने दानपेटीचे कुलूपही सोबत नेले. चोरट्याने रात्रीच्या वेळी मंदिराच्या मुख्य दरवाजाची कडी तोडून आत प्रवेश केला असावा. त्यानंतर दानपेटी फोडून रोकड घेऊन तो पसार झाल्याचा पोलिसांना संशय आहे. राऊत यांच्या तक्रारीवरून तहसील पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून पोलिस चोरट्याचा शोध घेत आहेत.