छत्रपती संभाजीनगर,
Three people die in Sambhajinagar छत्रपती संभाजीनगरमधील तिसगाव परिसरात एक अत्यंत हृदयद्रावक आणि दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे. कौटुंबिक वादातून जीवन संपवण्यासाठी डोंगरावर गेलेल्या तरुण मुलाला वाचवण्यासाठी गेलेल्या आई-वडिलांनाही आपला जीव गमवावा लागला असून, या दुर्घटनेत एकाच कुटुंबातील तिघांचा करुण अंत झाला आहे. देवळाई सातारा परिसरात राहणाऱ्या चांदवडे कुटुंबातील १८ वर्षीय मुलगा कुणाल मुरलीधर चांदवडे याचे त्याच्या वडिलांशी काही कारणांवरून भांडण झाले होते. या वादातून रागाच्या भरात कुणाल सकाळी १० वाजेच्या सुमारास तिसगाव येथील खवड्या डोंगरावर पोहोचला आणि कड्यावर उभा राहून आत्महत्या करण्याचा प्रयत्न करू लागला. ही माहिती मिळताच ग्रामस्थ, पोलीस, अग्निशमन दल आणि कुणालचे आई-वडील तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी सुरक्षेसाठी खाली जाळ्याही लावल्या होत्या, मात्र कुणाल सतत कड्यावर आपली जागा बदलत होता.

सुमारे तीन तास पोलीस, नागरिक आणि कुटुंबीय कुणालची विनवणी करत त्याला समजावण्याचा प्रयत्न करत होते. तिसगावचे माजी सरपंच संजय जाधव हेदेखील ५ फूट अंतरावर उभे राहून त्याला खाली येण्याची विनंती करत होते. कुणालची आई संगीता चांदवडे या “बाळा असं करू नको” म्हणत आक्रोश करत त्याला आळवत होत्या, परंतु तीव्र तणावात असलेला कुणाल कोणाचेही ऐकण्याच्या स्थितीत नव्हता.बराच वेळ विनवणी करूनही मुलगा ऐकत नसल्याने शेवटी खाली उभे असलेले त्याचे वडील मुरलीधर चांदवडे हे स्वतः डोंगरावर वर गेले. मुलाच्या जवळ जाऊन त्यांनी त्याचा हात धरून त्याला सुरक्षित मागे ओढण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्याच क्षणी कुणालचा तोल गेला आणि तो खाली कोसळला. त्याला वाचवण्याच्या तातडीच्या प्रयत्नात वडील मुरलीधर यांचाही तोल सुटला आणि दोघेही डोंगरावरून खाली पडले. या भीषण अपघातात बाप-लेकाचा जागीच मृत्यू झाला.
आपल्या डोळ्यांदेखत पती आणि तरुण मुलाचा असा भयानक अंत झालेला पाहून आई संगीता चांदवडे यांनी प्रचंड हंबरडा फोडला. दुःखाचा तीव्र आघात सहन न झाल्याने त्यांनीही कसलाही विचार न करता पळत जाऊन डोंगरावरून खाली उडी मारली. या घटनेत त्यांचाही जागीच दुर्दैवी मृत्यू झाला.काही मिनिटांतच डोळ्यांदेखत घडलेल्या या घटनेने घटनास्थळी उपस्थित असलेले पोलीस आणि ग्रामस्थ सुन्न झाले. एका क्षुल्लक भांडणातून सुरू झालेला हा प्रकार संपूर्ण कुटुंबाचा बळी घेईल अशी कल्पनाही कोणी केली नव्हती. घटनेनंतर पोलिसांनी तिन्ही मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी घाटी रुग्णालयात पाठवले आहेत. या घटनेमुळे देवळाई सातारा परिसर आणि तिसगाव परिसरात प्रचंड शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.