नवी दिल्ली,
trisha and gayatri created history नवी दिल्लीतील इंदिरा गांधी एरिना येथे सुरू असलेल्या बीडब्ल्यूएफ जागतिक अजिंक्यपद स्पर्धा २०२६ मध्ये भारताच्या त्रिशा जॉली आणि गायत्री गोपीचंद यांनी दमदार कामगिरी करत इतिहास रचला आहे. जागतिक क्रमवारीत ३९व्या स्थानावर असलेल्या भारतीय जोडीने महिला दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत चौथ्या मानांकित चीनच्या जिया यिफान आणि झांग शू जियान यांचा पराभव केला. या विजयासह त्रिशा आणि गायत्री यांनी भारतासाठी किमान कांस्यपदक निश्चित केले आहे.
सामन्याच्या सुरुवातीला त्रिशा जॉली आणि गायत्री गोपीचंद यांना अपेक्षित सुरुवात करता आली नाही. भारतीय जोडीला पहिला गेम १६-२१ असा गमवावा लागला. मात्र, त्यानंतर दोघींनी खेळात जबरदस्त सुधारणा करत सामन्यावर पकड मिळवली. दुसऱ्या गेममध्ये त्यांनी २१-१५ असा विजय मिळवत सामन्यात बरोबरी साधली.निर्णायक तिसऱ्या गेममध्येही भारतीय खेळाडूंनी आक्रमक खेळ कायम ठेवला. अखेर त्रिशा आणि गायत्री यांनी हा गेम २१-१३ असा जिंकत सामना आपल्या नावावर केला. चौथ्या मानांकित चिनी जोडीविरुद्ध मिळवलेला हा विजय भारतीय बॅडमिंटनसाठी विशेष महत्त्वाचा ठरला आहे.
त्रिशा आणि गायत्री यांच्या या कामगिरीमुळे जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतील महिला दुहेरीत भारताला तब्बल २०११ नंतर पदक मिळणार आहे. यापूर्वी ज्वाला गुट्टा आणि अश्विनी पोनप्पा यांनी २०११ मध्ये कांस्यपदक पटकावले होते. त्यानंतर या प्रकारात भारताला पदक मिळवता आले नव्हते.२०२६च्या स्पर्धेत भारतासाठी आतापर्यंत हे एकमेव पदक निश्चित झाले आहे. पीव्ही सिंधू, लक्ष्य सेन, उन्नती हुडा आणि आयुष शेट्टी यांच्यासारख्या पदकाच्या शर्यतीतील खेळाडूंना पराभवाचा सामना करावा लागला आहे. पीव्ही सिंधूला उप-उपांत्यपूर्व फेरीत चीनच्या तिसऱ्या मानांकित वांग झी यीकडून पराभव पत्करावा लागला.
गेल्या वर्षीच्या बीडब्ल्यूएफ जागतिक अजिंक्यपद स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीतही सिंधूला पराभवाचा सामना करावा लागला होता. दरम्यान, पुरुष दुहेरीत भारताची सात्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी ही जोडीही पदकाच्या शर्यतीत कायम आहे. पाचव्या मानांकित भारतीय जोडीसमोर शुक्रवारी उपांत्यपूर्व फेरीत तिसऱ्या मानांकित चीनच्या लियांग वेई केंग आणि वांग चांग यांचे आव्हान असणार आहे. सात्विक आणि चिराग यांनी हा सामना जिंकल्यास जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतील भारताचे दुसरे पदक निश्चित होईल. त्यामुळे त्रिशा जॉली आणि गायत्री गोपीचंद यांच्या ऐतिहासिक कामगिरीनंतर आता सर्वांचे लक्ष सात्विक-चिरागच्या सामन्याकडे लागले आहे.