मुंबई.
Tukaram Mundhe transferred to Rajasthan? आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांची महाराष्ट्रातून राजस्थानमधील सीकर येथे बदली झाल्याचा मेसेज सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या मेसेजमध्ये ही तुकाराम मुंढे यांची 26वी बदली असल्याचा दावाही करण्यात आला आहे. मात्र, या चर्चेत कोणतेही तथ्य नसल्याचे स्वतः तुकाराम मुंढे यांनी स्पष्ट केले आहे.काल झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना तुकाराम मुंढे यांनी राजस्थानमधील बदलीची शक्यता फेटाळून लावली. “माझा राजस्थानशी काय संबंध? माझी बदली राजस्थानमध्ये कशी होईल? असा सवाल त्यांनी केला. आपण महाराष्ट्र कॅडरचे अधिकारी असल्याने आपली बदली महाराष्ट्रातच होऊ शकते, असे त्यांनी स्पष्ट केले.

गेल्या काही काळापासून अन्न आणि औषध प्रशासन विभाग भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे चर्चेत होता. लाचखोरी आणि अन्य गैरप्रकारांच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाने तुकाराम मुंढे यांची या विभागाच्या आयुक्तपदी नियुक्ती केली. त्यानुसार त्यांनी 25 मे रोजी पदभार स्वीकारला.पदभार स्वीकारल्यानंतर भेसळयुक्त आणि नागरिकांच्या आरोग्यासाठी हानिकारक खाद्यपदार्थ व उत्पादनांविरोधात विभागाने कारवाईचा वेग वाढवला आहे. राज्यातील विविध भागांत एफडीएच्या पथकांकडून कारवाई सुरू असून, भेसळयुक्त माल जप्त करण्याबरोबरच अस्वच्छता आढळलेल्या हॉटेल, डेअरी आणि दुकानांचे परवाने निलंबित केले जात आहेत.
मुंढेंच्या आतापर्यंतच्या बदल्या
ऑगस्ट 2005 मध्ये प्रशिक्षणार्थी उपजिल्हाधिकारी, सोलापूर म्हणून कारकिर्दीची सुरुवात झाल्यानंतर सप्टेंबर 2007 मध्ये उपजिल्हाधिकारी, देगलूर उपविभाग, जानेवारी 2008 मध्ये सीईओ, जिल्हा परिषद नागपूर आणि मार्च 2009 मध्ये आयुक्त, आदिवासी विभाग म्हणून त्यांनी काम पाहिले.जुलै 2009 मध्ये सीईओ, वाशिम, जून 2010 मध्ये सीईओ, कल्याण, जून 2011 मध्ये जिल्हाधिकारी, जालना, सप्टेंबर 2012 मध्ये विक्रीकर सहआयुक्त, मुंबई आणि नोव्हेंबर 2014 मध्ये सोलापूर जिल्हाधिकारी म्हणून त्यांची नियुक्ती झाली.मे 2016 मध्ये आयुक्त, नवी मुंबई महापालिका, मार्च 2017 मध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी, पीएमपीएल, पुणे, फेब्रुवारी 2018 मध्ये आयुक्त, नाशिक महापालिका आणि नोव्हेंबर 2018 मध्ये सहसचिव, नियोजन म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली. त्यानंतर डिसेंबर 2018 मध्ये प्रकल्प अधिकारी, एड्स नियंत्रण, मुंबई आणि जानेवारी 2020 मध्ये आयुक्त, नागपूर महापालिका म्हणून त्यांची नियुक्ती झाली.ऑगस्ट 2020 मध्ये सदस्य सचिव, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, मुंबई, जानेवारी 2021 मध्ये राष्ट्रीय मानवाधिकार आयोग भारत, सप्टेंबर 2022 मध्ये आयुक्त आरोग्य सेवा व संचालक, राष्ट्रीय आरोग्य अभियान, 2022 मध्ये मराठी भाषा विभाग, जुलै 2022 मध्ये पशुसंवर्धन आणि दुग्ध विकास विभाग, जून 2024 मध्ये विकास आयुक्त (असंघटित कामगार), ऑगस्ट 2025 मध्ये सचिव, दिव्यांग कल्याण आयुक्तालय, मंत्रालय आणि मे 2026 मध्ये आयुक्त, अन्न व औषध प्रशासन अशी त्यांची नियुक्ती झाली आहे. त्यामुळे राजस्थानमधील सीकर येथे बदली झाल्याचा सोशल मीडियावरील दावा तुकाराम मुंढे यांनी स्पष्टपणे फेटाळला असून, आपण महाराष्ट्र कॅडरचे अधिकारी असल्याचे त्यांनी पुन्हा स्पष्ट केले आहे.