मुंबई,
Vanita Kharat's WhatsApp hacked ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्री वनिता खरात सायबर फसवणुकीची शिकार झाली आहे. पार्सलची डिलिव्हरी होणार असल्याचे सांगत आलेल्या एका फोननंतर काही सेकंदांत तिचे WhatsApp अकाउंट हॅक करण्यात आले. त्यानंतर तिच्या संपर्कातील लोकांना मदतीच्या नावाखाली पैसे मागणारे मेसेज पाठवण्यात आले. या प्रकारात काही जणांनी 62 हजार रुपयांपर्यंतची रक्कम पाठवल्याचे वनिताने सांगितले.वनिताने सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत या संपूर्ण प्रकाराची माहिती दिली. तिच्या म्हणण्यानुसार, तिला एक पार्सल येणार होते. त्याचदरम्यान एका व्यक्तीने फोन करून तो ब्लू डार्ट कंपनीतून बोलत असल्याचे सांगितले. डिलिव्हरी बॉयला पत्ता सापडत नसल्याने एका नंबरवर पत्ता पाठवण्यास सांगण्यात आले.
आपला पत्ता पार्सल मागवलेल्या कंपनीकडे आधीच उपलब्ध असल्याचे वनिताने फोन करणाऱ्या व्यक्तीला सांगितले. मात्र, त्याने दोन-तीन वेळा फोन केला. त्याने दिलेला नंबर वनिताने डायल केल्यानंतर काही सेकंदांत तिचे WhatsApp अकाउंट हॅक झाले आणि तिच्या फोनमधून WhatsApp लॉगआउट झाले.अकाउंट हॅक केल्यानंतर आरोपीने वनिताचे कॉल्स दुसऱ्या नंबरवर फॉरवर्ड केल्याचेही तिने सांगितले. त्यानंतर तिच्या WhatsApp संपर्क यादीतील अनेकांना ‘मी अडचणीत आहे, मला मदत करा’ अशा आशयाचे मेसेज पाठवण्यात आले. या मेसेजमध्ये 62 हजार रुपये पाठवण्याची मागणी करण्यात आली.वनिताच्या काही मित्रांनी या मेसेजवर विश्वास ठेवून पैसेही पाठवले. त्यामुळे या फसवणुकीमुळे आर्थिक नुकसान होण्यासोबतच तिच्या ओळखीच्या लोकांमध्ये गैरसमज निर्माण होण्याची शक्यताही निर्माण झाली.