नवी दिल्ली,
new players get a chance भारत आणि श्रीलंका यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना २३ ऑगस्टपासून कोलंबो येथे खेळवला जाणार आहे. पहिल्या सामन्यात पराभव झाल्यानंतर श्रीलंकेने दुसऱ्या कसोटीसाठी आपल्या संघात मोठे बदल केले आहेत. श्रीलंका क्रिकेट बोर्डाने सामन्याच्या दोन दिवस आधी नव्या संघाची घोषणा केली असून, दुखापतींच्या समस्येमुळे संघरचनेत मोठी उलथापालथ झाली आहे.पहिल्या कसोटीदरम्यान दुखापतीमुळे मैदानाबाहेर गेलेला दिनेश चांदीमल आता दुसऱ्या सामन्यातही खेळणार नाही. त्याचबरोबर निशान मदुश्का, रमेश मेंडिस आणि दिलशान मदुशंका यांनाही संघातून वगळण्यात आले आहे. दुसरीकडे कामिल मिशारा आणि सहान अराचिगे यांना संघात स्थान देण्यात आले आहे. या दोन्ही खेळाडूंनी अद्याप कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केलेले नाही. त्यामुळे अंतिम अकरामध्ये संधी मिळाल्यास त्यांचा हा पहिलाच कसोटी सामना ठरणार आहे.

पहिल्या कसोटीत पराभव आणि खेळाडूंच्या दुखापती यामुळे श्रीलंकेसमोर दुसऱ्या सामन्यापूर्वी मोठे आव्हान उभे राहिले आहे. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेअंतर्गत ही मालिका सुरू असून गुणतालिकेत भारत पाचव्या, तर श्रीलंका सहाव्या स्थानावर आहे. दुसऱ्या कसोटीसाठी श्रीलंकेच्या संघात लाहिरू उदारा, कामिल मिशारा, पसिंदु सूर्याबंदारा, कामिंडु मेंडिस, धनंजय डीसिल्वा, सहान अराछिगे, सोनल दिनुशा, निरोशन डिकवेला, केशरा नुवंता, प्रभात जयसूर्या, मिलन रत्नायके, लाहिरू कुमारा, असिता फर्नांडो आणि विश्वा फर्नांडो यांचा समावेश आहे. धनंजय डीसिल्वा संघाचे नेतृत्व करणार असून कामिंडु मेंडिस उपकर्णधार आहे.
भारतीय संघातही दमदार पर्याय
भारताने मालिकेसाठी जाहीर केलेल्या संघात कर्णधार शुभमन गिल, उपकर्णधार केएल राहुल, यशस्वी जायसवाल, ऋषभ पंत, सरफराज खान, ध्रुव जुरेल, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मानव सुथार, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, गुरनूर बरार, देवदत्त पडिक्कल, सारांश जैन आणि औकिब नबी यांचा समावेश आहे. पहिल्या सामन्यात आघाडी घेतलेल्या भारतीय संघाचे लक्ष्य आता दुसरी कसोटी जिंकून मालिकेवरही शिक्कामोर्तब करण्याचे असेल.