
तरुण भारतच्या शंभराव्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित विशेष सोहळ्यात ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. रामदासपेठेतील संस्कृती सेलिब्रेशन येथे गुरुवार, २० ऑगस्ट रोजी पार पडलेल्या या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी श्री नरकेसरी प्रकाशन संस्थेचे अध्यक्ष, प्रसिद्ध होमिओपॅथ, पद्मश्री डॉ. विलास डांगरे होते. संस्थेचे कार्याध्यक्ष अनिल दांडेकर, प्रबंध संचालक धनंजय बापट, मुख्य संपादक शैलेश पांडे आणि महाव्यवस्थापक देवेंद्र टोणपे यांची व्यासपीठावर उपस्थिती होती. यावेळी मान्यवरांच्या हस्ते विदर्भाचा विकास आणि वाटचाल उलगडणाऱ्या ‘समृद्ध विदर्भ’ विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले.
प्रास्ताविकात मुख्य संपादक शैलेश पांडे यांनी शताब्दी वर्षात ‘तरुण भारत’ने सामाजिक बांधिलकी जपत राबविलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. एखादे वृत्तपत्र शंभर वर्षे सातत्याने चालणे आणि भक्कमपणे उभे राहणे ही साधी बाब नाही. मात्र, आता पुढील शंभर वर्षांची आव्हाने स्वीकारण्याची तयारी करावी लागणार आहे. बदलत्या काळानुसार तरुण भारतच्या पाऊलखुणा अधिक बळकट होत असून, पुणे आवृत्तीच्या माध्यमातून ‘नागपूर तभा’चे कार्यक्षेत्र विस्तारत आहे. त्यामुळे पुढील शतकी प्रवासही अधिक ताकदीने पार पडेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सोहळ्याला श्री नरकेसरी प्रकाशन संस्थेचे संचालक उदयभास्कर नायर, मीरा कडबे, समीर गौतम, अशोक मानकर यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर, हितचिंतक आणि वाचक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रशांत मुनिश्वर यांनी आ. संजय भेंडे यांचा परिचय करून दिला. कार्यक्रमाचे संचालन विशेषांक संपादक अनिल फेकरीकर यांनी, तर आभारप्रदर्शन देवेंद्र टोणपे यांनी केले. यावेळी मुख्य वार्ताहर वैभव व्यवहारे, आनंद मोहरील, नामदेव भदे, सिद्धार्थ रामटेके, अभिजित वर्तक. अनिल कांबळे, पराग मगर, अनंत मुळे, विजय जामगडे, प्रवीण मेंढी, संदीप नंदनवार, किरण राजदेरकर यांच्यासह सहकारी उपस्थित होते. या विशेषांकासाठी सुरेश बेले, मंगेश कल्याणकर, प्रशांत मोरे, दिनेश बोरकर, दीप्ति राखुंडे, पंकज गणोरकर, योगेश काटे, मीनल चतुरपाळे, कशिश कारेमोरे यांनी परिश्रम घेतले.
अनिल दांडेकर मनोगतात म्हणाले, तरुण भारतसोबतच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचेही हे शताब्दी वर्ष आहे. या पृष्ठभूमीवर संघाच्या ‘पंचपरिवर्तन’ संकल्पनेची माहिती विविध उपक्रमांच्या माध्यमातून तरुण भारतने समाजापर्यंत पोहोचविली. शताब्दी महोत्सवाच्या काळातच पुणे आवृत्तीचीही दमदार सुरुवात झाली. तरुण भारत पुण्यात स्थिरावत असून, वाचकांचा प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे हे वृत्तपत्र पुण्यातही आपले अढळ स्थान निर्माण करेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.