मुंबई
‘3 इडियट्स’ या गाजलेल्या चित्रपटातून प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन करणारे अभिनेते परीक्षित सहानी सध्या चर्चेत आले आहेत. चित्रपटात फरहानच्या स्ट्रिक्ट वडिलांची, म्हणजेच ‘सुरज कुरेशी’ यांची महत्त्वाची भूमिका साकारणाऱ्या सहानी यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ते काठीच्या आधाराने चालताना दिसत असून, त्यांची ही अवस्था पाहून चाहते भावूक झाले आहेत.
व्हायरल व्हिडीओमध्ये परीक्षित सहानी एका सार्वजनिक ठिकाणी अडखळत चालताना दिसत आहेत. त्यांना पुढे जाण्यासाठी एका कर्मचाऱ्याने खांद्याचा आधार दिल्याचेही दिसते. सहानी यांनी पायजमा आणि टी-शर्ट परिधान केला असून, डोक्यावर लाल रंगाची टोपी आहे. त्यांच्या हातात चालण्यासाठी काठी आहे. वाढत्या वयाचा परिणाम त्यांच्या हालचालींवर स्पष्टपणे जाणवत असला, तरी या व्हिडीओमध्ये ते हसतानाही दिसत आहेत.
सहानी यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आल्यानंतर चाहत्यांनी त्यावर भावनिक प्रतिक्रिया व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे. ‘3 इडियट्स’मधील त्यांची भूमिका आठवत अनेकांनी त्यांच्या प्रकृतीबद्दल चिंता व्यक्त केली. एका नेटकऱ्याने ‘लेजेंड’ अशी प्रतिक्रिया दिली, तर दुसऱ्याने ‘यालाच आयुष्य म्हणतात’ असे म्हटले. आणखी एका नेटकऱ्याने विनोदी अंदाजात, ‘असं वाटतं फरहान अद्याप सेट नाही झाला,’ अशी कमेंट केली.
परीक्षित सहानी यांनी आपल्या दीर्घ कारकिर्दीत अनेक गाजलेल्या हिंदी चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. ‘3 इडियट्स’व्यतिरिक्त ‘पीके’, ‘सुल्तान’ आणि ‘लगे रहो मुन्ना भाई’ यांसारख्या चित्रपटांमध्येही त्यांनी काम केले आहे. ते हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते बलराज साहनी यांचे पुत्र आहेत. वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत त्यांनी अभिनय क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली.परीक्षित सहानी सध्या 82 वर्षांचे असून गेल्या काही काळापासून ते प्रसिद्धीपासून दूर आहेत. दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमुळे त्यांच्या जुन्या भूमिका आणि विशेषतः ‘3 इडियट्स’मधील ‘सुरज कुरेशी’ हे पात्र पुन्हा एकदा चाहत्यांच्या चर्चेत आले आहे.