भारत-नेदरलँड्समध्ये हॉकीचा महामुकाबला!

    दिनांक :22-Aug-2026
Total Views |
नवी दिल्ली,
showdown between india and the netherlands हॉकी विश्वचषक २०२६ मध्ये भारतीय पुरुष संघासमोर आता यजमान नेदरलँड्सचे तगडे आव्हान असणार आहे. स्पर्धेच्या पुढील टप्प्यात पोहोचलेल्या भारतीय संघासाठी हा सामना अत्यंत महत्त्वाचा असून, उपांत्य फेरीच्या शर्यतीत कायम राहण्यासाठी या सामन्यात चांगली कामगिरी करण्याचे लक्ष्य संघासमोर आहे.
 
 
showdown between india and the netherlands
 
भारतीय संघाने ‘पूल डी’मधील तीन सामन्यांपैकी दोन सामने जिंकत आणि एका सामन्यात पराभव स्वीकारत पुढील फेरी गाठली आहे. आता भारताचा समावेश ‘पूल ई’मध्ये झाला असून या गटात इंग्लंड, नेदरलँड्स आणि अर्जेंटिना हे संघ आहेत. भारताला या टप्प्यात नेदरलँड्स आणि अर्जेंटिनाविरुद्ध सामने खेळायचे आहेत. या गटातील अव्वल दोन संघांना उपांत्य फेरीत प्रवेश मिळणार असल्याने भारतासाठी प्रत्येक सामना महत्त्वाचा ठरणार आहे.
 
भारत आणि नेदरलँड्स यांच्यातील सामना २२ ऑगस्ट रोजी आम्स्टेलवीन येथील वेगेनर स्टेडियमवर होणार आहे. भारतीय वेळेनुसार हा सामना सायंकाळी ७.३० वाजता सुरू होईल. विश्वचषकाच्या अधिकृत वेळापत्रकानुसार नेदरलँड्स-भारत पुरुषांचा सामना स्थानिक वेळेनुसार दुपारी ४ वाजता आहे. भारत-नेदरलँड्समधील आतापर्यंतच्या सामन्यांचा विचार केला, तर डच संघाचे पारडे जड राहिले आहे. दोन्ही संघांमध्ये झालेल्या २४ सामन्यांपैकी नेदरलँड्सने ११ सामने जिंकले आहेत, तर भारताला सहा सामन्यांत विजय मिळाला आहे. सात सामने अनिर्णित राहिले आहेत. त्यामुळे घरच्या मैदानावर खेळणाऱ्या नेदरलँड्सविरुद्ध भारतीय संघाला आपला सर्वोत्तम खेळ दाखवावा लागणार आहे.
 
नेदरलँड्सने विश्वचषकाच्या पहिल्या टप्प्यात दमदार प्रदर्शन करत आपले तिन्ही सामने जिंकले आहेत. त्यामुळे भारतीय संघासमोर मजबूत प्रतिस्पर्ध्याचे आव्हान असेल. उपांत्य फेरीच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी भारताला या टप्प्यातील दोन्ही सामने जिंकणे महत्त्वाचे ठरणार आहे. भारतीय चाहत्यांना हा सामना स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर थेट पाहता येणार आहे. सामन्याचे ऑनलाइन प्रक्षेपण जिओहॉटस्टारवर उपलब्ध असेल. याशिवाय डीडी स्पोर्ट्स आणि डीडी फ्रीडिशवरही सामन्याचे थेट प्रक्षेपण पाहता येणार आहे.