मोर्शी
action-against-police येथून जवळच असलेल्या डोंगरयावली येथील शेतशिवारात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर मोर्शी पोलिसांनी टाकलेल्या धाडीत घटनास्थळावरून पळून जाणाऱ्या एका ३३ वर्षीय युवकाचे प्रेत २२ ऑगस्टला विहिरीत संशयास्पदरीत्या आढळून आले. याप्रकरणी मृताच्या कुटुंबीयांसह शेकडो नागरिकांचा जमाव मोर्शी पोलिस स्टेशनवर धडकला. जोपर्यंत जुगारावर धाड टाकणाऱ्या पोलिस पथकावर कार्यवाही होत नाही. तसेच मृताच्या कुटुंबीयांना १५ लाखांची आर्थिक मदत मिळत नाही, तोपर्यंत प्रेत दवाखान्यातून हलविण्यात येणार नाही, अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतल्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
२० ऑगस्टला पोलिसांनी डोंगरयावली शेतशिवारात बोपची नामक शेतकऱ्याच्या शेतातील जुगारावर धाड टाकली. ९ जणांना रंगेहात पकडण्यात आले. मात्र, काही इसमांनी घटनास्थळावरून पलायन केले. त्यात डोंगरयावली येथील सुरज अशोकराव चढोकर हा ३३ वर्षीय युवक होता. आज अचानक ३०० मीटर अंतरावर असलेल्या शेतातील विहिरीत सुरजचे प्रेत तरंगताना आढळून आले. त्यामुळे संपूर्ण डोंगरयावली गावात पोलिसांविरुद्ध तीव्र संताप व्यक्त करण्यात आला.
पोलिसच सुरजच्या मृत्यूला जबाबदार असल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. मृताच्या कुटुंबासह गावातील शेकडो नागरिकांनी मोर्शी पोलिस स्टेशनवर मोर्चा नेऊन संबंधित पोलिस पथकावर कार्यवाही करण्याची व मृताच्या कुटुंबांना आर्थिक मदत द्यावी, अन्यथा शवविच्छेदन होऊ देणार नाही व प्रेतसुद्धा उचलणार नाही, अशी भूमिका घेतली. यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी उमेश पाटील व प्रभारी ठाणेदार वाघमारे यांनी आंदोलकांची भूमिका जाणून घेतली व त्यांना आर्थिक मदत देता येणार नाही. परंतु, याप्रकरणी सखोल चौकशी करून दोषी असणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांवर वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन दिले. तरीसुद्धा जोपर्यंत आर्थिक मदत मिळणार नाही, तोपर्यंत येथून हलणार नाही, अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतली. वृतलिहेस्तोवर कोणत्याही प्रकारचा तोडगा निघाला नसल्यामुळे ठिय्या आंदोलन सुरूच होते.