अमरावती
dr-sunil-deshmukh २०१८ च्या इज ऑफ लिव्हींग इंडेक्समध्ये सोळाव्या स्थानी असलेले अमरावती शहर आता बकाल झाले आहे. शहरातील स्वच्छता तसेच कायदा व सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला असतानाच या शहरातील नागरिकांवर वाढीव मालमत्ताकराचा बोजा लादण्यात येत आहे. विद्यमान लोकप्रतिनिधी त्यासाठी जबाबदार असल्याने ते आता ‘एनिमी ऑफ पीपल’ठरले आहेत, असा आरोप माजी पालकमंत्री डॉ. सुनील देशमुख यांनी आज पत्रकार परिषदेतून केला.

यावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष बबलू शेखावत, मनपातील विरोधी पक्षनेते विलास इंगोले, माजी महापौर मिलींद चिमोटे, नझीर खान यावेळी उपस्थित होते. डॉ. देशमुख यांनी स्वच्छता, मालमत्ता कर, व्यापार संकूल भाडे, शहरातील कायदा व सुव्यवस्था, वाहतूक व्यवस्था व रखडलेल्या विकास प्रकल्पांवर प्रकाश टाकत विद्यमान सत्ताधारी लोकप्रतिनिंधींवर आरोपांच्या फैरी झाडल्या. ते म्हणाले, तत्कालीन मनपा प्रशासकांनी स्वच्छतेचा कंत्राट विकून टाकला. शहरातील स्वच्छता संपली असून यावर कोणताच लोकप्रतिनीधी का बोलत नाही. मंत्रालयातून चौकशीचे आदेश पारित होत असताना ते विभागीय आयुक्तांपर्यंत का पोहोचत नाहीत, यावरही ते प्रश्न उपस्थित करीत नाहीत. शहराच्या स्वच्छतेचा बोजवारा उडाला असताना नागरिकांवर मात्र वाढीव मालमत्ताकराचा बोजा लादण्यात येत आहे. स्थगिती मिळवल्यानंतर तो रद्द केल्याचे पोस्टर्स लावणारे लोकप्रतिनिधी आता स्थगिती उठवल्यानंतर चकार शब्दही काढत नाहीत. त्यांनी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून अमरावतीकरांची दिशाभूल केल्याचा आरोप त्यांनी केला. लोकप्रतिनिधींचा पोलिसांवर वचकच राहलेला नसल्याने शहरातील कायदा व सुव्यवस्था पार बिघडली असून वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाल्याचा आरोप त्यांनी केला. २०१८ मध्ये लिज संपल्यानंतरही मनपाच्या व्यापार संकूलाचे भाडेदर निश्चित होत नसल्याने ती जबाबादारी कुणाची, असाही सवाल त्यांनी केला. इतवारा बाजार उड्डाण पुल, राजकमल चौक रेल्वे उड्डाणपुल, भुयारी गटर योजना, विमानतळावरील नाईट लॅंडींग, ऐतिहासीक परकोटाची दुरूस्ती, फिशरीज हब हे विकासाचे प्रकल्प रखडेलेले असून उद्यानांची दुरावस्थेला विद्यमान लोकप्रतिनिधी जबाबदार असून नागरिकांना सोयी सुविधा देण्यात ते अपयशी ठरल्याचे ते म्हणाले.
//मनपा आयुक्त फोटो काढण्यात व्यस्त
स्वच्छतेच्या कामाची पाहणी करण्यासाठी महापालिका आयुक्त विविध प्रभागांमध्ये पाहणी दौरे करीत आहेत. या दौऱ्यात ते स्थानिक नगरसेवक व अधिकाऱ्यांना घेतात व फोटोसेशन व रिल्स तयार करून सोशल मीडियातून व्हायरल करतात. पाहणी दौऱ्यानंतर शहर स्वच्छ का होत नाही, दौरे केवळ फोटो काढण्यासाठी आहेत का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.