केसांसाठी लिंबू-कांदा खरंच फायदेशीर?

    दिनांक :22-Aug-2026
Total Views |
lemon and onion really beneficial for hair केसांची वाढ व्हावी, कोंडा कमी व्हावा आणि केसगळती थांबावी यासाठी सोशल मीडियावर अनेक घरगुती उपाय सांगितले जातात. यामध्ये लिंबू आणि कांद्याचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. मात्र, हे उपाय प्रत्यक्षात केसांसाठी किती उपयुक्त आहेत, याबाबत त्वचारोगतज्ज्ञ डॉ. आंचल पंथ यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.
 
lemon and onion really beneficial for hair
 
कोंड्याच्या समस्येवर अनेकजण लिंबाचा रस थेट टाळूवर लावतात. मात्र, हा उपाय प्रत्येकासाठी फायदेशीर ठरेलच असे नाही. डॉ. आंचल यांच्या मते, टाळूवर लिंबाचा वापर केल्यास काही लोकांमध्ये जळजळ होऊ शकते. तसेच टाळूवरील नैसर्गिक तेलाचे प्रमाण कमी होऊन त्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असते. त्यामुळे कोंडा असल्यास लिंबासारख्या घरगुती उपायांपेक्षा केटोकोनाझोल, झिंक पायरीथिओन किंवा सेलेनियम सल्फाइड यांसारखे घटक असलेले अँटी-डँड्रफ शॅम्पू अधिक योग्य ठरू शकतात.
 
केसगळती कमी करण्यासाठी कांद्याचा रस वापरण्याची पद्धतही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात लोकप्रिय आहे. कांद्याचा रस किंवा कांद्याचे तेल केसांच्या वाढीसाठी उपयुक्त असल्याचा दावा केला जातो. मात्र, सामान्य स्वरूपाची केसगळती किंवा विशिष्ट प्रकारच्या केसगळतीवर कांद्याचा रस प्रभावी ठरतो, याचे ठोस वैज्ञानिक पुरावे उपलब्ध नाहीत. कांद्यामधील सल्फर केसांचे बंध मजबूत करतो, हा दावा देखील वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झालेला नसल्याचे डॉ. आंचल यांनी स्पष्ट केले आहे.
 
त्यामुळे केसगळती वारंवार होत असेल किंवा टाळूवर कोंडा मोठ्या प्रमाणात निर्माण होत असेल, तर केवळ घरगुती उपाय करून समस्या दूर करण्याचा प्रयत्न करण्याऐवजी त्यामागील नेमके कारण जाणून घेणे महत्त्वाचे आहे. कारणानुसार योग्य उपचार घेतल्यास केस आणि टाळूचे आरोग्य सुधारण्यास अधिक मदत होऊ शकते.