मुलाच्या वाढदिवसाच्या ऑर्केस्ट्रात बस शिरून बापासह पाच ठार!

    दिनांक :22-Aug-2026
Total Views |
बेतिया,
Bus crashes into orchestra; five killed मुलाच्या सहाव्या वाढदिवसाच्या आनंदावर काळाने गदा आणल्याची अत्यंत दुर्दैवी घटना बिहारमधील बेतिया येथे घडली आहे. देवेंद्र दुबे यांच्या चिमुकल्याच्या वाढदिवसानिमित्त घरासमोरच रस्त्याच्या कडेला ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात ट्रकला वाचवण्याच्या नादात एक भरधाव प्रवासी बस थेट गर्दीत घुसली. या भीषण अपघातात देवेंद्र दुबे यांच्यासह बहादुर महतो, संजय कुमार, भोला दुबे आणि चांगुर राम या पाच जणांचा चिरडून दुर्दैवी मृत्यू झाला, तर १२ जण गंभीर जखमी झाले.
 

Bus crashes into orchestra; five killed 
 
 
गोरखपूरहून बेतियाकडे जाणाऱ्या प्रवासी बसची बेतिया-बागा-लौरिया मुख्य मार्गावर समोरून येणाऱ्या ट्रकशी टक्कर होणार होती. अपघात टाळण्याच्या प्रयत्नात बसचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि बस थेट रस्त्याकाठच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात शिरली. या अचानक झालेल्या घटनेमुळे घटनास्थळी एकच आक्रोश आणि गोंधळ उडाला. लौरिया पोलिसांनी तातडीने धाव घेत जखमींना बेतिया जीएमसीएच रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. अपघातानंतर संतप्त झालेल्या स्थानिक नागरिकांनी बस, ट्रकसह कार्यक्रमातील खुर्च्या आणि स्पीकरची तोडफोड केली. परिस्थिती तणावपूर्ण बनल्याने नरकटियागंजचे एसडीपीओ जयप्रकाश सिंह यांनी पोलीस ताफ्यासह पोहोचून जमावाला शांत केले. पोलिसांनी पाचही मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवले असून या संपूर्ण अपघाताचा कसून तपास केला जात आहे.