स्मशानभूमी बनली मानसिक शांतीचे केंद्र

निसर्गरम्य वातावरण व आकर्षक साैंदर्यीकरण

    दिनांक :22-Aug-2026
Total Views |
वरुड
crematorium गाव खेड्यात वेशीवर निर्जन भागांत मानवी देहावर अंतिम संस्कार करण्यात येतात. परंतु, तालुक्यातील ग्राम लोणी येथील स्मशानभूमीत गावाकडे परतणारी माणसेसुद्धा मानसिक शांतीसाठी येतात. मसणवट, मृत्यूलोक, भूत, पिशाच्च असे काहीसे शब्द स्मशानभूमीसाठी वापरले जातात. परंतु, लोणीच्या काही समाजसुधारकांनी एकत्रित येत या भीती निर्माण करणाऱ्या शब्दांना या स्मशानभूमीतुन हद्दपार केले आहे. लोकवर्गणीतून साकारलेल्या स्वर्गापेक्षाही सुंदर मोक्षधामात भीती नाही तर शांती मिळत असल्याचा अनुभव कित्येकांनी आपल्या बोलून दाखविला असून लोणीचे मोक्षधाम हे मानवमंदिर, प्रबोधनाचे केंद्र आहे, असे म्हटल्या जाते. निसर्गरम्य वातावरणात स्वर्गापेक्षाही सुंदर असे मानवाचे अंतिम स्थान असावे या विचाराने प्रेरित होत लोणी स्मशानभूमीत हा कायापालट करण्यात आला आहे.
 
smashan
माणसाने पै-पै जमवून संपत्ती गोळा केली. मोठा झाला, प्रतिष्ठा आली. मात्र, अन्त्यसंस्काराची वेळ आल्यावर गावाच्या वेशीवर किंवा नदीच्या काठावर निर्जन स्थळी नेऊन अग्निसंस्कार केले जातात. या सरकारी जागेत दफनविधी करून नात्यागोत्यातील सगेसोयरे, मित्रपरिवार श्रद्धांजली वाहून मोकळे होतात. मात्र, लोणी येथील मोक्षधाममधील स्वर्गलोकाचे दर्शन घडविणाऱ्या निसर्गरम्य वातावरणाने कुणालाही निरोप घ्यावासा वाटणार नाही.
वासुदेव पोहरकर यांच्या नेतृत्वात सर्व समाजसुधारकांनी एकादशी व सणासुदीच्या दिवसाला एकत्रित येत हळूहळू लोकवर्गणी गोळा केली व श्रमदानातून स्वर्गापेक्षाही सुंदर मोक्षधाम निर्माण केला. येथे मानवी जीवनाचा संदेश देण्याकरिता महामानवांच्या मूर्ती स्थापित करण्यात आल्या आहे. विविध प्रकारचे वृक्ष-वेली, फुलझाडे लावली आहेत. या मोक्षधामात चिताग्नी देणाऱ्यांकरिता शॉवर बसविण्यात आले आहे. संगीतमय वातावरणात श्रद्धांजली वाहिली जाते. संत तुकाराम महाराज, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, वैराग्यमूर्ती गाडगेबाबा, महात्मा जोतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या प्रबोधनकारी विचारांच्या मानवी जीवनाचा अर्थबोध करणाऱ्या म्हणीतून जीवनातील सत्याचे आकलन करण्यात येते.
संस्थेचे अध्यक्ष गोपाल मालपे, मोक्षधाम देखभाल समितीचे वासुदेव पोहरकर, बापुराव मेंढे, राजू मालपे, रवी पापडकर, सुनील मोतीखाये, प्रदीप झाडे, नितीन टेंभे, भारत मेंढे, चंद्रपाल चारे, चंद्रशेखर तायवाडे, प्रभाकर गायकी, सुरेश पाचघरे, सुभाष आगरकर, गजानन बोरकुटे, राजू आगरकर, निखिल बोडखे, विनोद उघडे, लीलाधर कासुर्डे, मिलिंद दुर्गे, ईश्वर सोनारे, योगेश झाडे या २१ समाजबांधवांकडून नि:स्वार्थ भावनेने येथे सेवा दिली जाते.