मुंबई,
dog will stay with the police पोलीस दलात १० वर्षांची प्रदीर्घ आणि अखंड सेवा बजावून निवृत्त होणाऱ्या श्वानांच्या उर्वरित आयुष्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि संवेदनशील निर्णय घेतला आहे. सेवा पूर्ण झाल्यानंतरही हे श्वान आता पोलिसांसोबतच राहतील आणि त्यांच्या भोजनाचा व देखभालीचा सर्व आर्थिक भार राज्य शासनाचा गृहविभाग उचलणार आहे.१० वर्षांच्या प्रदीर्घ सेवेदरम्यान श्वानाला त्याच्या रखवालदारासोबत राहण्याची आणि भोजनाची सवय जडलेली असते.
आतापर्यंत निवृत्तीनंतर या श्वानांना इतर ठिकाणी दत्तक दिले जायचे. परंतु, आपल्या नियमित साथीदारापासून आणि सरावलेल्या वातावरणापासून दुरावल्यामुळे श्वानांचे मानसिक स्वास्थ्य बिघडून ते अनेकदा अन्नत्याग करत असत. प्रामाणिक सेवा देणाऱ्या श्वानांचे निवृत्तीनंतर असे हाल होऊ नयेत, यासाठी मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे निवृत्त श्वानांचे उर्वरित आयुष्य त्यांच्या परिचित रखवालदारासोबत सुखकर आणि आनंदी जाईल. त्यांच्या भोजनाचा आणि आरोग्याचा संपूर्ण खर्च गृहविभाग करणार असल्याने दलातील या प्रामाणिक साथीदारांचा सन्मान राखला गेला आहे. मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.