भंडारा
farmers शिग्रसंचार द्रुतगती महामार्गासाठी (एक्सप्रेसवे) सुरू असलेल्या भूसंपादन प्रक्रियेविरोधात आणि शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी सोमवार, २४ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १० वाजता भंडारा जिल्हाधिकारी कार्यालयावर एकदिवसीय धडक मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. 'शिग्रसंचार द्रुतगती महामार्ग शेतकरी संघर्ष समिती' (भंडारा–गडचिरोली–चंद्रपूर–गोंदिया) यांच्या वतीने या आंदोलनाची घोषणा करण्यात आली असून, २० ऑगस्ट रोजी जिल्हा प्रशासनाला याबाबतचे निवेदन सादर करण्यात आले.
जमीन आमची — हक्क आमचा'चा नारा
शिग्रसंचार द्रुतगती महामार्गाच्या प्रस्तावित मार्गामुळे भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर आणि गोंदिया या चारही जिल्ह्यांतील मोठ्या प्रमाणावर शेतकरी बाधित होणार आहेत. केवळ कागदी आश्वासने न देता पारदर्शक भूसंपादन, योग्य मोबदला आणि बाधित कुटुंबांच्या भविष्याचा ठोस विचार करावा, अशी मुख्य मागणी संघर्ष समितीने केली आहे. "आम्ही आमची जमीन देणार नाही" असा ठाम निर्धार व्यक्त करत शेतकऱ्यांच्या हक्कांवर होणारी मनमानी खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा प्रशासनाला देण्यात आला आहे.
हा लढा कोणत्याही एका विशिष्ट गावापुरता किंवा व्यक्तीपुरता मर्यादित नसून चारही जिल्ह्यांतील बळीराजाच्या अस्तित्वाचा आणि भवितव्याचा सामूहिक लढा आहे. त्यामुळे पक्ष, गट आणि आपसातील मतभेद बाजूला सारून चारही जिल्ह्यांतील सर्व शेतकरी बांधवांनी २४ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता भंडारा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संघर्ष समितीचे अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांच्या वतीने करण्यात आले आहे.