रत्नागिरी
ratnagiri news खेड तालुक्यात स्त्री-पुरुष समानतेचा आणि पुरोगामी विचारांचा आदर्श घालून देणारी घटना समोर आली आहे. खेड महाडनाका येथील लक्ष्मीबाई तुकाराम पालांडे यांच्या निधनानंतर त्यांच्या पाचही मुलींनी आईच्या अंत्यसंस्काराची संपूर्ण जबाबदारी स्वतः पार पाडली. चार मुलींनी आईच्या पार्थिवाला खांदा दिला, तर मोठी कन्या ममता मंगेश भोसले यांनी मुखाग्नी देत अंत्यसंस्काराचे विधी पूर्ण केले. ‘अंत्यसंस्कारासाठी मुलगाच हवा’ या पारंपरिक मानसिकतेला छेद देणाऱ्या या कृतीचे खेड तालुक्यासह रत्नागिरी जिल्ह्यात कौतुक होत आहे.
मु. पो. खेड महाडनाका, ता. खेड, जि. रत्नागिरी येथील रहिवासी गं. भा. लक्ष्मीबाई तुकाराम पालांडे यांचे २१ ऑगस्ट २०२६ रोजी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात पाच मुली, जावई आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे.
आईच्या निधनानंतर त्यांच्या मुलींनी दुःखाच्या प्रसंगी खंबीर भूमिका घेतली. जिल्हा परिषद शाळा तिसे शिगवणवाडी, ता. खेड येथे प्राथमिक शिक्षिका म्हणून कार्यरत असलेल्या मोठ्या कन्या ममता मंगेश भोसले (मुळगाव तिसंगी, ता. खेड) यांच्यासह त्यांच्या बहिणी सुनयना सुधीर सावंत, ज्योती हरिष मोरे, सुजाता राहूल भोसले आणि निता विक्रम रेपाळे यांनी आईच्या अंत्यसंस्काराची जबाबदारी स्वीकारली.रूढी-परंपरांच्या चौकटीत न अडकता चारही बहिणींनी आईच्या पार्थिवाला स्वतः खांदा दिला. त्यानंतर ममता मंगेश भोसले यांनी आईला मुखाग्नी देत अंतिम संस्कार पार पाडले. या घटनेतून स्त्रिया कोणत्याही बाबतीत पुरुषांपेक्षा कमी नाहीत, असा स्पष्ट संदेश समाजासमोर आला आहे. पारंपरिक समजुतींना छेद देत मुलींनी घेतलेल्या या धाडसी भूमिकेचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.