ड्रग्ज प्रकरणात माजी राष्ट्रीय कुस्तीपटू अमित अटकेत

    दिनांक :22-Aug-2026
Total Views |
नवी दिल्ली,
Former national wrestler Amit in custody तीन वर्षांपासून पोलिसांना चकमा देणाऱ्या भारताचा माजी राष्ट्रीय स्तरावरील कुस्तीपटू अमित याला अखेर बेड्या ठोकण्यात यश आले आहे. २०१३ च्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत कांस्य पदक विजेता असलेला आणि मूळचा हरियाणातील रोहतकचा रहिवासी असलेला अमित एका ड्रग्ज नेटवर्कशी जोडला गेला होता. एप्रिल २०२३ मध्ये रांची येथील धुरवा पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यांतर्गत दाखल झालेल्या प्रकरणात सुमारे ५०० ग्रॅम प्रतिबंधित ड्रग्ज जप्त करण्यात आले होते. या तपासात नाव समोर आल्यापासून तो २०२३ पासून पोलिसांना हुलकावणी देत फरार होता.

Former national wrestler Amit in custody
 
रांची पोलिसांनी अथक शोधमोहीम राबवल्यानंतर अमित दिल्लीत लपून बसल्याची गुप्त माहिती मिळाली. यानंतर रांची पोलिसांनी दिल्ली पोलिसांच्या मदतीने सापळा रचत १८ ऑगस्ट २०२६ रोजी दिल्लीच्या रोहिणी भागातील मधुबन चौकाजवळ धडक कारवाई करून अमितला ताब्यात घेतले. अटकेनंतर स्थानिक न्यायालयात हजर करून त्याला ट्रान्झिट रिमांडवर रांचीला नेण्यात आले आहे. तपास यंत्रणांना संशय आहे की या नेटवर्कचा वापर झारखंडमधून दिल्लीत ड्रग्जची वाहतूक करण्यासाठी केला जात होता. पोलीस आता या प्रकरणातील अमितची भूमिका, संपूर्ण पुरवठा साखळी आणि इतर साथीदारांची कसून चौकशी करत आहेत. तीन वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या तपासात अमितची अटक अत्यंत महत्त्वपूर्ण मानली जात आहे.