ट्रॅव्हलर आणि टिप्परचा भीषण अपघात; १४ भाविक गंभीर

रमणा फाट्याजवळील घटना

    दिनांक :22-Aug-2026
Total Views |
सेलू
horrific-collision गुजरात राज्यातील वडद येथील भाविकांना घेऊन जाणाऱ्या डी. डी. ०३ डब्ल्यू. ९६६६ क्रमांकाच्या क्रूझर ट्रॅव्हलर वाहनाने पुढे चाललेल्या टिप्परला मागून जोरदार धडक दिली. या अपघातात क्रूझर ट्रॅव्हलरमधील १४ प्रवासी गंभीर जखमी झाले. हा अपघात शनिवार २२ ऑगस्ट रोजी दुपारी १ वाजताच्या सुमारास नागपूर-तुळजापूर महामार्गावरील सेलू तालुक्यातील रमणा फाटा भारतीय धाब्यासमोर झाला.
 
wardha
 
मिळालेल्या माहितीनुसार, वडद येथील २२ भाविक ट्रॅव्हलरने नांदेड येथे दर्शनासाठी जात होते. चालकाचा भारतीय धाब्यासमोर वाहनावरील ताबा सुटल्याने ट्रॅव्हलरची समोरच्या टिप्परशी जोरदार धडक झाली. ही धडक एवढी भीषण होती की ट्रॅव्हलरचा दर्शनी भाग चक्काचूर झाला. यामध्ये क्रूझरचा चालक गंभीर जखमी झाला असून १४ प्रवाशांनाही गंभीर दुखापत झाली आहे.
घटनेची माहिती मिळताच सेलू पोलिस स्टेशनचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करत स्थानिक नागरिक व रुग्णमित्र प्रज्वल लटारे यांच्या मदतीने बचावकार्य राबवले. जखमींना सेवाग्राम येथील कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
अपघातात जखमी झालेल्यांमध्ये राखीपाल पाटील (४५), साया मक्षी गोंड (३), राजूदेव रावते (३७), तेजल रशीदभाई भारत (१८), हिना तुळशे डोनमाल्या (२४), सुरेश रावते (३५), प्रवीण जानू कहात (४१), हर्षदा ईश्वर कहात (२७), गंगाबाई ईश्वर कहात (४७), जमशेत रतन खलनायक (५६), रामू रामजीभाई रावत (४५), प्रकाशभाई गुणाभाई वाधवा (३६), रोमा निलेश थोरात (३५) आणि सुमित्रा बल्लू वरखन (४०) सर्व रा. गुजरात यांचा समावेश आहे.
या अपघाताचा पुढील तपास सेलूचे ठाणेदार पंकज वाघोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक निरंजन वरभे, मंगेश राऊत, सुनील चावरे, जमादार जावेद धामीया आदी करीत आहे.
अपघातांची मालिका थांबणार कधी?
वर्धा-नागपूर महामार्गावरील रमणा फाटा हा वारंवार अपघात घडणारा ब्लॅक स्पॉट ठरत आहे. या ठिकाणी क्रॉसिंग असल्याने रस्ता ओलांडणाऱ्या वाहनांना समोरून भरधाव येणारी वाहने शेवटच्या क्षणापर्यंत दिसत नाहीत आणि अपघात होतो. विशेष म्हणजे येथे क्रॉसिंग, वेगमर्यादा किंवा सावधानतेचे कोणतेही ठळक सूचनाफलक नसल्याने वाहनचालकांना धोका लक्षात येत नाही. त्यामुळे या ठिकाणी तातडीने चेतावणी फलक, वेगनियंत्रण उपाययोजना व सुरक्षित क्रॉसिंगची व्यवस्था करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.