kareena kapoor बॉलिवूडची ‘बेबो’ अर्थात अभिनेत्री करीना कपूर खान पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. नुकताच करीना हिचा जिमबाहेरचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. या व्हिडीओमध्ये करीना ब्लॅक रंगाच्या जिमवेअरमध्ये दिसत असून, तिच्या लूकवरून काही नेटकऱ्यांनी ती प्रेग्नंट असल्याचा अंदाज व्यक्त केला. काही युजर्सनी तर करीना कपूर आणि सैफ अली खान यांच्या तिसऱ्या बाळाबाबत चर्चाही सुरू केली. मात्र, या सर्व चर्चांवर आता करीनाच्या टीमने स्पष्ट प्रतिक्रिया दिली आहे.
करीना नुकतीच जिमच्या बाहेर स्पॉट झाली होती. यावेळी तिने ब्लॅक रंगाचे जिमवेअर परिधान केले होते आणि तिच्या हातात पाण्याची बाटली होती. ती जिममधून बाहेर येत असताना तिच्यासोबत तिचा स्टाफही उपस्थित होता. विशेष म्हणजे, कॅमेऱ्यांपासून करीनाला वाचवण्यासाठी तिचा स्टाफ छत्रीच्या मदतीने तिला झाकताना दिसला. याचदरम्यान पॅपाराझींनी तिचा व्हिडीओ कॅमेऱ्यात कैद केला.
हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच नेटकऱ्यांचे लक्ष करीनाच्या लूककडे गेले. विशेषतः तिच्या पोटाकडे पाहून काही युजर्सनी ती प्रेग्नंट असल्याचा अंदाज व्यक्त केला. तिचा लूक काहींना बेबी बंपसारखा वाटल्याने कमेंट सेक्शनमध्ये तिच्या प्रेग्नन्सीबाबत प्रश्न उपस्थित होऊ लागले.
एका युजरने, ‘ओह, तर ती प्रेग्नंट आहे का? की हा जुना व्हिडीओ आहे?’ असा सवाल केला. तर दुसऱ्या युजरने ‘हे खरं आहे का?’ अशी प्रतिक्रिया दिली. काहींनी थेट ‘बाळ येणार आहे’ असं म्हणत करीनाच्या तिसऱ्या बाळाची चर्चा सुरू केली. दुसरीकडे, अनेक सोशल मीडिया युजर्सनी हा व्हिडीओ जुना असण्याची शक्यताही व्यक्त केली. त्यामुळे करीनाच्या प्रेग्नन्सीच्या चर्चांना सोशल मीडियावर चांगलाच वेग आला.
मात्र, या चर्चांवर आता करीनाच्या टीमने स्पष्टीकरण दिलं आहे. सोशल मीडियावर प्रेग्नन्सीच्या अफवा वेगाने पसरल्यानंतर ‘हिंदुस्तान टाइम्स’शी बोलताना करीनाच्या टीमने अभिनेत्री प्रेग्नंट नसल्याचं स्पष्ट केलं. करीनाच्या प्रेग्नन्सीबाबत सुरू असलेल्या सर्व चर्चा चुकीच्या असल्याचं टीमने सांगितलं.
यावेळी करीनाच्या लूकबाबत विनोदी अंदाज व्यक्त करत तिच्या टीमने हा ‘पास्ता, पिझ्झा आणि सुट्ट्यांचा परिणाम’ असल्याचं म्हटलं. त्यासोबतच ‘बॅड कॅमेरा अँगल’चाही त्यात वाटा असल्याचं टीमकडून सांगण्यात आलं. त्यामुळे करीना कपूर तिसऱ्यांदा आई होणार असल्याच्या चर्चांना तिच्या टीमने पूर्णविराम दिला आहे.