‘महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स’चा दुसरा टीझर प्रदर्शित

‘कोणाच्या डोक्यावर बॉम्ब लागणार?’ने उत्सुकता शिगेला

    दिनांक :22-Aug-2026
Total Views |
maharashtra epstein files भोंदू कॅप्टन अशोक खरात प्रकरणावर आधारित ‘महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स’ या नव्या मराठी सिनेमाची सध्या सर्वत्र चर्चा रंगली आहे. काही दिवसांपूर्वी सिनेमाचा पहिला टीझर प्रदर्शित झाल्यानंतर आता दुसरा टीझरही सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आला आहे. ‘कोणाच्या डोक्यावर बॉम्ब लागणार…?’ असं कॅप्शन देत प्रदर्शित करण्यात आलेल्या या टीझरने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे.
 

maharashtra epstein files second teaser out: “whose head will the bomb hit?” sparks curiosity 
दुसऱ्या टीझरची सुरुवात एका महिलेच्या अंगात आल्याचे दृश्य दाखवत होते. त्यानंतर अभिनेत्री दिपाली सय्यद यांची एन्ट्री विशेष चर्चेचा विषय ठरत आहे. टीझरमध्ये एका कारची डिक्की पैशांनी भरलेली असल्याचेही पाहायला मिळते. मात्र, सर्वाधिक लक्ष वेधून घेणारा प्रसंग म्हणजे अभिनेत्री मंदिरात बसून स्वतःची अनामिका कापताना दिसत आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून अशोक खरात यांच्याकडे खरोखरच दैवी शक्ती होती की नव्हती, याचा उलगडा होणार असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर या टीझरची जोरदार चर्चा सुरू आहे.
‘महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स’ हा सिनेमा 2 ऑक्टोबर 2026 रोजी प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाच्या कथानकाचा काही भाग महाराष्ट्राच्या राजकारणाभोवती फिरत असल्याचेही समोर आले आहे. चित्रपटात अनेक कलाकार असून, प्रत्येक नेत्याची यामध्ये भूमिका असल्याचे दिपाली सय्यद यांनी यापूर्वी सांगितले होते.
सिनेमाचा पहिला टीझर प्रदर्शित झाल्यानंतर दिपाली सय्यद यांनी चित्रपटाबाबत प्रतिक्रिया दिली होती. “आता टीझर लॉन्च झाला आहे, सगळ्यांनी बघितला आणि लोक त्याला खूप चांगला प्रतिसाद देत आहेत. दोन ऑक्टोबरला चित्रपट रिलीज होणार आहे. हा एक वेगळा आणि रियल सब्जेक्ट आहे. या चित्रपटात बरेच कलाकार आहेत. स्टेप बाय स्टेप तुमच्यापर्यंत सगळं येईल. प्रत्येक नेत्यांचा यामध्ये रोल आहे,” असं त्या म्हणाल्या होत्या.
दरम्यान, सिनेमाचे शूटिंग सुरू असताना दिपाली सय्यद यांना धमकी मिळाल्याची माहितीही समोर आली होती. याबाबत बोलताना त्यांनी धमक्या आता थांबल्या असल्याचे सांगितले होते. पुन्हा फोन आल्यास तक्रार दाखल करण्याचे ठरवले होते, असेही त्यांनी स्पष्ट केले होते. तसेच, शूटिंगच्या सेटवर गार्ड ठेवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले होते.
अशोक खरात प्रकरण, कथानकातील दैवी शक्तीचा दावा, पैशांनी भरलेली कारची डिक्की, दिपाली सय्यद यांची भूमिका आणि महाराष्ट्राच्या राजकारणाभोवती फिरणारी कथा यामुळे ‘महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स’कडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे. आता 2 ऑक्टोबरला प्रदर्शित होणाऱ्या या सिनेमातून नेमके काय समोर येते, याची उत्सुकता वाढली आहे.