अनिल कांबळे
नागपूर,
nagpur police संपूर्ण नागपूर पोलिस दलातील प्रत्येक पोलिस कर्मचारी आणि अधिकारी माझ्या कुटुंबाचा सदस्य आहे. माझ्या कुटुंबासारख्या पोलिस दलातील अडीअडचणी सोडविण्यासाठी प्राधान्य देत आहे. त्यांच्या प्रत्येक अडचणीबाबत कोणताही संकोच न बाळगता आपण केव्हाही आणि कधीही उपलब्ध आहे, अशी माहिती पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी दिली.
नागपूर पोलिस दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मानसिक आरोग्याबाबत गांभीर्याने विचार सुरू झाला आहे. पोलिस कर्मचाऱ्यांनी वैयक्तिक किंवा व्यावसायिक अडचणी मनात न ठेवता वरिष्ठ अधिकाऱ्यांशी मोकळेपणाने संवाद साधावा, यासाठी पोलिस दलात व्यापक मानसिक आरोग्य आणि तणाव व्यवस्थापन मोहीम राबविण्याची तयारी सुरू आहे. पोलिस कर्मचाऱ्यांनी आपल्या अडचणींबाबत कोणताही संकोच न बाळगता वरिष्ठांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी केले.
पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी अडचण असल्यास माझ्याशी संवाद साधावा. मुक्तपणे समस्या मांडाव्या. त्या समस्या सोडविण्यासाठी सकारात्मक प्रयत्न करण्यात येतील, असेही आयुक्त नांगरे पाटील यांनी स्पष्ट केले.
कर्मचारी-अधिकाऱ्यांत व्हावा मुक्त संवाद
पोलिस खाते हे शिस्तप्रिय खाते म्हणून ओळखले जाते. वरिष्ठांचा वेगळाच आदर पोलिस खात्यात असतो. त्यामुळे पोलिस कर्मचारी आणि वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांमध्ये मुक्त संवादाची उणीव आहे. मात्र, वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी कनिष्ठ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसोबत समन्वय आणि मुक्त संवाद साधण्यासाठी मार्ग खुला केला आहे.
कर्मचाऱ्यांच्या समस्या ऐकून त्या सोडविण्यासाठी प्रयत्न केले जातील. पोलिस दलात अधिक मोकळे आणि सहकार्याचे वातावरण निर्माण करण्याची गरज असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.
मानसिक आरोग्य मोहिमेत पोलिस कर्मचाऱ्यांमधील तणावाची सुरुवातीची लक्षणे ओळखणे, मानसिक आरोग्याबाबत जनजागृती करणे आणि अडचणींबाबत संवाद साधण्यास प्रोत्साहन देणे यावर भर दिला जाणार आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आपल्या पथकातील कर्मचाऱ्यांशी नियमित संवाद साधावा, तसेच त्यांच्या वर्तनातील अचानक बदल किंवा मानसिक तणावाची लक्षणे वेळीच ओळखावीत, यासाठीही प्रयत्न केले जाणार आहेत.
दरम्यान, नागपूर पोलिस आयुक्तालयाच्या अॅप्लिकेशन्स अँड प्रोटोकॉल शाखेत कार्यरत असलेले एपीआय ज्ञानेश्वर झोल यांनी गिट्टीखदान येथील पोलिस वसाहतीतील निवासस्थानी आत्महत्या केल्याची घटना घडली होती. त्यामुळे पोलिस अधिकारी आणि पोलिस कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक, शारीरिक व मानसिक आरोग्याबाबत असलेल्या समस्या सोडविण्यासाठी वरिष्ठांकडून प्रयत्न करण्यात येणार आहेत. कर्तव्य बजावताना येणाऱ्या अडचणी किंवा आरोग्याबाबत असलेल्या समस्या सोडविण्यासाठी सकारात्मक प्रयत्न वरिष्ठ स्तरावरून करण्यात येणार आहेत.