सिम कार्डसाठी बायोमेट्रिक KYC अनिवार्य, जाणून घ्या नवे नियम

    दिनांक :22-Aug-2026
Total Views |
मुंबई
new sim card देशभरात वाढत असलेल्या डिजिटल फसवणुकीच्या आणि ओळख चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने मोबाईल सिम कार्ड वितरणाचे नियम अधिक कडक केले आहेत. दूरसंचार (वापरकर्ता ओळख) नियम, २०२६ अंतर्गत आता नवीन मोबाईल कनेक्शन घेण्यासाठी बायोमेट्रिक KYC अनिवार्य करण्यात आली आहे. या नव्या धोरणाची संपूर्ण माहिती दूरसंचार विभागाच्या (DoT) अधिकृत पोर्टलवर प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यामुळे खोटी माहिती देऊन किंवा दुसऱ्याच्या नावावर सिम कार्ड घेण्याच्या प्रकारांना आळा घालण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.
 

new sim card rules 2026: biometric kyc now mandatory, check new sim verification rules 
नवीन सिम कार्ड घेण्यासाठी ग्राहकाची प्रत्यक्ष उपस्थिती आणि बायोमेट्रिक पडताळणी बंधनकारक असेल. नोंदणीकृत ओळखपत्रांच्या आधारे ही प्रक्रिया ई-KYC किंवा डिजिटल KYC (D-KYC) पद्धतीने केली जाणार आहे. विशेष म्हणजे, हा नियम केवळ नवीन सिम कार्ड घेण्यापुरता मर्यादित राहणार नाही. सिम कार्ड हरवल्यानंतर नवीन सिम घेणे, तसेच नाव, लिंग किंवा जन्मतारखेसारख्या वैयक्तिक तपशीलांमध्ये बदल करण्यासाठीही बायोमेट्रिक पडताळणी करावी लागणार आहे.
कॉर्पोरेट किंवा व्यावसायिक मोबाईल कनेक्शनच्या बाबतीतही नियम अधिक कडक करण्यात आले आहेत. अशा कनेक्शनसाठी मूळ मालकासोबतच प्रत्यक्ष सिम वापरणाऱ्या व्यक्तीची म्हणजेच End User ची ओळखही पडताळली जाणार आहे.
दरम्यान, चुकीची माहिती, बनावट कागदपत्रे किंवा दुसऱ्या व्यक्तीच्या ओळखीचा गैरवापर करून सिम कार्ड मिळवण्याचा प्रयत्न केल्यास संबंधित प्रकरण थेट पोलिसांकडे सोपवले जाणार आहे. अशा प्रकरणात कनेक्शन तातडीने रद्द करण्याची कारवाईही केली जाऊ शकते.ग्राहकांच्या खासगी माहितीच्या सुरक्षेचीही काळजी घेण्यात आली आहे. बायोमेट्रिक पडताळणी पूर्ण झाल्यानंतर ग्राहकाच्या मोबाईलवर तातडीने अलर्ट पाठवला जाणार आहे. तसेच, सिम विक्री केंद्रांवर (PoS) ग्राहकांचा बायोमेट्रिक डेटा साठवला जाणार नाही. हा डेटा एनक्रिप्टेड स्वरूपात थेट संबंधित दूरसंचार कंपनीच्या सुरक्षित सर्व्हरवर पाठवला जाणार असल्याने ग्राहकांची वैयक्तिक माहिती सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.